मालमत्तेच्या कारणावरून शीनाची हत्या - सीबीआय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

मुंबई - शीना बोरा हत्येमध्ये उद्योगपती पीटर मुखर्जी हा महत्त्वाचा आरोपी असून मालमत्तेच्या कारणावरून तिची हत्या करण्यात आली, असा दावा सीबीआयने पुरवणी आरोपपत्रात केला आहे. विशेष म्हणजे, पीटरचा मुलगा राहुल या खटल्यात प्रमुख साक्षीदार आहे.

मुंबई - शीना बोरा हत्येमध्ये उद्योगपती पीटर मुखर्जी हा महत्त्वाचा आरोपी असून मालमत्तेच्या कारणावरून तिची हत्या करण्यात आली, असा दावा सीबीआयने पुरवणी आरोपपत्रात केला आहे. विशेष म्हणजे, पीटरचा मुलगा राहुल या खटल्यात प्रमुख साक्षीदार आहे.

पीटरची पत्नी इंद्राणी हिची मुलगी असलेल्या शीनाची हत्या चार वर्षांपूर्वी (एप्रिल 2012) गळा दाबून करण्यात आली. तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील एका जंगलात जाळून टाकण्यात आला होता. त्या वेळी पीटर परदेशात होता; मात्र हत्येशी संबंधित सर्व घडामोडी त्याला प्रमुख आरोपी इंद्राणी सांगत होती. मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचेही त्याला माहीत होते, असे सीबीआयने आरोपपत्रात स्पष्ट केले आहे. शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपपत्रानुसार हत्येचा मुख्य उद्देश हा मालमत्ता असून शीनाच्या नावावर असलेली पीटर व इंद्राणीची वारेमाप संपत्ती परत मिळवण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. इंद्राणी आणि शीनाचे संबंध खूपच बिघडले होते, हे त्यांच्यातील ई-मेल आणि एसएमएसवरून स्पष्ट झाले आहे; पण पीटरलाही शीना आवडत नव्हती, कारण तिचे राहुलशी प्रेमसंबंध होते. राहुलच्या नात्याला माझा विरोध नव्हता, असा दावा पीटरने केला होता; मात्र प्रत्यक्षात त्यांच्यातील ई-मेलवरून पीटरला त्या दोघांचे प्रेमसंबंध मान्य नव्हते, असे सीबीआयने म्हटले आहे.

इंद्राणीचा मुलगा मिखाईलही या खटल्यात महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याच्या हत्येचा कटही इंद्राणीने रचला होता. शीना व मिखाईल ही इंद्राणीच्या पहिल्या पतीपासून झालेली मुले आहेत. पीटर तिचा तिसरा नवरा आहे. सीबीआयच्या पहिल्या आरोपपत्रातही मालमत्तेचा मुद्दा अधोरेखित केला होता. आता सर्व आरोपींवर न्यायालय आरोप निश्‍चित करणार आहे.

Web Title: shina bora murder for property reason