
Pravin Darekar : सरकारवर टीका करणाऱ्यांना दावोसची गुंतवणुक ही चपराक; प्रवीण दरेकर
मुंबई : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राला मिळालेली परकीय गुंतवणुक ही शिंदे-फडणवीस सरकारवरील विश्वासाची पावती असून सरकारवर टीका करणाऱ्यांना मोठी चपराक आहे, अशा शब्दांत भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला.
या परिषदेत राज्य सरकारने आतापर्यंत विविध कंपन्यांसोबत सव्वा लाखकोटी रुपयांहूनही जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण व रोजगारनिर्मिती होईल, असेही दरेकर यांनी पत्रकारांना सांगितले. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्राचा फारसा विकास झाला नाही.
त्या काळातील मुख्यमंत्र्यांनी स्वतः दावोसला न जाता फक्त आपल्या चिरंजीवांना तेथे पर्यटनाला पाठवले, अशा शब्दांत दरेकर यांनी ठाकरे पितापुत्रांची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोसमधील कामगिरीचे कौतुक करण्याऐवजी शिंदे यांनी गुजरातला जायला हवे होते अशी टीका करणारे संजय राऊत कोत्या मनोवृत्तीचे आहेत, असे ताशेरेही दरेकर यांनी झोडले.
एखाद्या राज्यात गुंतवणूक यायची असेल तर गुंतवणूकदारांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. आता राज्यात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर येणार असल्यामुळे कोल्हेकुई करणाऱ्यांना ही चपराक आहे, असेही दरेकर म्हणाले.