मुंबईत शिवजयंती उत्साहात साजरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

दादर - तिथीनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंतीनिमित्त मुंबईभर विविध कार्यक्रम होत असतानाच दादर शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या वतीने राजांना मानाचा मुजरा करण्यात आला. मनसेतर्फे दादरमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, शांतता क्षेत्रात ढोल-ताशा वाजविल्याप्रकरणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांना शिवाजी पार्क पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

दादर - तिथीनुसार साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंतीनिमित्त मुंबईभर विविध कार्यक्रम होत असतानाच दादर शिवाजी पार्कमध्ये मनसेच्या वतीने राजांना मानाचा मुजरा करण्यात आला. मनसेतर्फे दादरमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, शांतता क्षेत्रात ढोल-ताशा वाजविल्याप्रकरणी मनसेचे नेते अमेय खोपकर यांना शिवाजी पार्क पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

शिवाजी पार्कमध्ये शिवतीर्थावर शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यावर मनसेच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल-ताशा पथकात प्रामुख्याने मुलींचा समावेश होता. पथकात ३० ढोल होते. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी, संदीप देशपांडे, विनोद खोपकर, मनसे नेते शशांक नागवेकर, नितीन सरदेसाई, माजी नगरसेवक संदीप देशपांडे आदी सोहळ्याला उपस्थित होते. मनसे कार्यकर्त्यांसह स्थानिक रहिवासीही मोठ्या प्रमाणात जमले होते. अमेय खोपकर यांच्या पत्नी स्वाती यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली.

मनसेला ढोल पडले भारी
शिवजयंतीनिमित्त अमेय खोपकर यांनी शिवाजी पार्कात ढोल-ताशा पथक बोलावले होते. शिवाजी पार्क शांतता क्षेत्र असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचा आवाज आणि ध्वनिप्रदूषण करण्यास बंदी आहे. तरीही नियमांचे उल्लंघन होऊन ढोल-ताशांचा गजर झाल्याने शिवाजी पार्क पोलिसांनी खोपकर यांना नोटीस बजावली. त्यानंतरही खोपकर यांनी फटाके वाजवल्याने आवाजाची मर्यादा तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घाटकोपरमध्ये  शिवज्योत यात्रा 
घाटकोपर -  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८७ व्या जयंतीनिमित्त घाटकोपर येथील ‘शिवजयंती उत्सव समिती’तर्फे शिवनेरी किल्ला ते घाटकोपर अशी शिवज्योत यात्रा काढण्यात आली. यंदा या यात्रेचे ३८ वे वर्ष आहे. सोमवारी किल्ले शिवनेरी, जुन्नर ते घाटकोपर; मुंबई या मार्गावर शेकडो किलोमीटरची दौड करत शिवज्योत मुंबईत आणली. या शिवज्योत दौडमध्ये यंदा प्रथमच तरुणीही सहभागी झाल्या होत्या. पोलिस सहायक आयुक्त भीमदेव राठोड यांनी शिवज्योत हातात घेऊन तरुणांना प्रोत्साहन दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष कल्पेश शेलार यांनी दिली. 

नायगावमध्ये  शिवजयंतीनिमित्त मिरवणूक
वडाळा - नायगाव लेबर कॅम्प येथील सद्‌गुरू सेवा संस्थेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त बुधवारी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.   शिवाजी महाराजांचा जयघोष करत ही मिरवणूक नायगाव लेबर कॅम्पमधून नायगाव पोलिस वसाहत, ग. द. आंबेकर मार्गाने पुन्हा लेबर कॅम्प परिसरात आणण्यात आली.  सद्‌गुरू सेवा संस्थेला मंगळवारी (ता.१५) ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने मिरवणूक आणि रायगड किल्ल्याची २० फूट उंच प्रतिकृती तयार करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

बोरिवलीत  शिवजयंती उत्साहात                                
बोरिवली - छत्रपती शिवाजी महाराज जयंती बोरिवलीत उत्साहात साजरी झाली. सामजिक संस्था, शिवसेना, मनसेतर्फे शिवजयंतीनिमित्त विविध सुंदर देखावे सादर केले. शिवसेना शाखा क्रमांक १० तर्फे सुंदर चलच्चित्रे सादर करण्यात आली होती. सुस्वर भजन कार्यक्रम आणि देखावा पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

Web Title: Shiv Jayanti celebrations in Mumbai