पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार, मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शने

पेट्रोल दरवाढीविरोधात शिवसेनेचा एल्गार, मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शने

मुंबईः पेट्रोलचे दर नव्वद रुपयांपेक्षा जास्त झाल्याच्या निषेधार्थ आज शिवसैनिक रस्त्यावर उतरले. आमदार प्रकाश सुर्वे, महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेवक संजय घाडी, तेजस्वी घोसाळकर, शीतल म्हात्रे आदी लोकप्रतिनिधींसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी दहिसर, लालबाग, घाटकोपर, चेंबूर आदी ठिकाणी निदर्शने केली. 

सकाळीच या लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मुंबईतील विविध रेल्वेस्थानकांबाहेर जमून उग्र निदर्शने केली. भगवे ध्वज आणि केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक हाती घेतलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली. लालबागला महापौरांच्या तसेच आमदार यामिनी जाधव, माजी मंत्री सचिन अहिर आदींच्या नेतृत्वाखाली पेट्रोल, डिझेल दरवाढीबरोबरच गॅस दरवाढीचाही निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सिलेंडरही सोबत आणले होते. 

शिवसेना विभाग क्रमांक एक तर्फे बोरिवली रेल्वे स्थानकासमोर झालेल्या निदर्शनात आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासह विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीमती सुजाता पाटेकर, नगरसेविका रिद्धी खुरसंगे, मुंबई बँकेचे संचालक आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, संजना घाडी उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी असताना भारतात ते एवढ्या विक्रमी स्तरावर जाण्याचे काहीच कारण नाही. केंद्राने पेट्रोलवरील दर कमी करून भाववाढ नियंत्रणात आणून जनतेला दिलासा द्यावा, असे प्रकाश सुर्वे म्हणाले. तर केंद्राने पेट्रोलला जीएसटी च्या कक्षेत आणल्यास भाववाढ आटोक्यात येऊन जनतेला दिलासा मिळेल, असे अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले. 

शिवसैनिकांनी चेंबूर आणि घाटकोपर येथेही तीव्र निदर्शने केली. केंद्र सरकार सर्वसामान्यांची फसवणूक करून इंधनाची दरवाढ करीत आहे. सततच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेले सामान्य नागरिक केंद्राला धडा शिकवल्याखेरीज राहणार नाहीत. पेट्रोलच्या किंमतीमधील मोठा वाटा करांच्या रुपाने केंद्र सरकारलाच मिळतो आणि फारच थोडा वाटा राज्य सरकारकडे जातो. त्यामुळे केंद्रानेच कर कमी केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल, असे विभागप्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले.

केंद्र सरकार सर्व प्रकारे जनतेला आणि राज्य सरकारांना लुबाडत आहे. राज्यांना जीएसटीचा वाटाही वेळेत दिला जात नाही, अच्छे दिनच्या नावाखाली उद्योगपतींचेच भले करण्यात आले आहे, अशीही टीका त्यांनी केली. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलने करीत असताना शहरी सर्वसामान्यांची अवस्थाही त्यापेक्षा वेगळी नाही, अशी टीका नगरसेविका अश्विनी हांडे यांनी केली. तर केंद्र सरकारला गरीबांची काहीही चिंता नाही हेच अशा घटनांमधून दिसते, असा टोला नगरसेवक सुरेश पाटील यांनी लगावला.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Shiv Sena Activists today protest against increase petrol price mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com