मदरसे, मशिदींवरही धाड घालणार का? : 'सामना' 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

मुंबई: त्र्यंबकेश्‍वरमध्ये पुरोहितांवर घातलेल्या धाडींवरून शिवसेनेने आज (शुक्रवार) पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि विशेषत: भाजपवर टीकास्त्र सोडले. 'परदेशांतून येणाऱ्या पैशांचा हिशोब मागण्यासाठी मदरसे आणि मशिदींवर प्राप्तिकर खात्याचे अधिकारी धाड घालणार का?' असा प्रश्‍न शिवसेनेने 'सामना' या मुखपत्राच्या अग्रलेखात विचारला आहे. 

मुंबई: त्र्यंबकेश्‍वरमध्ये पुरोहितांवर घातलेल्या धाडींवरून शिवसेनेने आज (शुक्रवार) पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि विशेषत: भाजपवर टीकास्त्र सोडले. 'परदेशांतून येणाऱ्या पैशांचा हिशोब मागण्यासाठी मदरसे आणि मशिदींवर प्राप्तिकर खात्याचे अधिकारी धाड घालणार का?' असा प्रश्‍न शिवसेनेने 'सामना' या मुखपत्राच्या अग्रलेखात विचारला आहे. 

प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी त्र्यंबकेश्‍वरमधील दोन पुरोहितांची चौकशी केली. अचानक केलेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली. नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर घातलेल्या या छाप्यांवर शिवसेनेने 'सामना'तून कडाडून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावरही शिवसेनेने टीका केली होती. 

'त्र्यंबकेश्‍वरमधील दोन पुरोहितांकडे सापडलेल्या घबाडामुळे समस्त पुरोहित वर्गास बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरे म्हणजे, काळ्या पैशासंदर्भात प्राप्तिकर खात्याने त्र्यंबकेश्‍वरमधील पुरोहितांकडे धाडी घालाव्यात, हे एक कोडेच आहे. उद्या सगळ्याच तीर्थक्षेत्रांवरील पुरोहितांवर धाडी घालून त्यांना आरोपी केले जाणार आहे का? काळा पैसा शोधायला कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही; पण या कारवाईचा बडगा केवळ सामान्य माणसावर, त्यातही हिंदूंवर उगारला जाऊ नये, इतकेच!' अशी भूमिका 'सामना'तील अग्रलेखात घेतली आहे. 

'नोटाबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सुरू झालेल्या लढाईचा सर्वाधिक फटका हिंदूंनाच बसत आहे,' असा दावाही यात करण्यात आला आहे. तसेच, 'काळा पैसा फक्त मंदिरातील पुरोहितांकडेच आहे, असा शोध लावून मोदी सरकारने आपण पक्के निधर्मी असल्याचे जाहीर करून टाकले. देशातील चर्चना मोठ्या प्रमाणावर परदेशातून पैसा येतो. विशिष्ट मशिदींमधून धर्मांध शक्तींना मोठा अर्थपुरवठा होतच आहे. इस्लामी राष्ट्रांतून मशिदी, मदरसे यांच्यासाठी परदेशी चलन सुसाट येत आहे. या पैशांचा हिशोब मागण्यासाठी मदरसे, मशिदींवर प्राप्तिकर खात्याचे शूर अधिकारी धाडी घालतील का,' अशा शब्दांत 'सामना'ने या छापासत्रांवर टीका केली आहे. 

Web Title: Shiv Sena again criticizes PM Narendra Modi; questions raids in Trimbakeshwar