मुस्लिम समाजातल्या लहान मुलांसाठी शिवसेनेची अजान स्पर्धा, भाजपची टीका

पूजा विचारे
Monday, 30 November 2020

शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे.  मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे पांडुरंग सकपाळ यांनी म्हटलं आहे.

मुंबईः  शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलं आहे.  मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे पांडुरंग सकपाळ यांनी म्हटलं आहे. बसीरत ऑनलाइनशी संवाद साधताना पांडुरंग सकपाळ यांनी ही माहिती दिली. 

मुस्लिम समाजातल्या लहान मुलांना अजानची गोडी लागावी.  त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही स्पर्धा घेतली जातेय. तसंच अजानला विरोध करणं चुकीचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलेय. 

मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. माझ्या घराजवळ मुस्लिम वस्ती आहे. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. अजानमध्ये गोडवा असून त्यामुळे मनःशांती मिळते. अजानचं मला नेहमीच अप्रूप वाटत राहिलं आहे. त्यामुळेच मुस्लिम समाजातील मुलांसाठी अजानची स्पर्धा घेण्याचं माझ्या मनात आलं.  अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस देण्यात येईल. यासाठी मौलाना परीक्षकाचे काम पाहतील.  या स्पर्धेचा खर्च शिवसेना करणार आहे, असं पांडुरंग सकपाळ यांनी सांगितलं.

मुस्लिम समाजातील लहान मुले अप्रतिम अजान देतात. त्यांच्या या कलागुणांना वाव देणं हा त्या मागचा हेतू आहे. अशी स्पर्धा देशात कुठे झाली असेल असं वाटत नाही. हा पहिलाच प्रयोग असून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा असल्याचंही ते म्हणालेत. 

अधिक वाचा- "माझी फाईल पुढेच जात नाही", धावपटू कविता राऊत यांनी राज्यपालांकडे केली तक्रार

स्पर्धेवर भाजपची टीका 

शिवसेनेनं आयोजन केलेल्या अजानच्या स्पर्धेवर भाजपनं टीका केली आहे. 
शिवसेनेने अजान स्पर्धा ठेवून  भगवा खाली उतरवलेला आहे आणि हिरवा खांद्यावर घेण्यासारखा आहे, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे यांच हिंदुत्व तर शिवसेनेने सोडलं आहे मात्र अल्पसंख्यांकांच्या मतदानासाठी लांगूलचालन शिवसेना करत आहे, असं भातखळकर म्हणालेत.

Shiv Sena Ajaan competition for children Muslim community BJP criticism


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena Ajaan competition for children Muslim community BJP criticism