नाईकांविरोधात शिवसेना नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऐरोली व बेलापूर मतदारसंघात दोन वेगवेगळ्या उमेदवारी देण्याविरोधात नवी मुंबईच्या शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

नवी मुंबई : भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ऐरोली व बेलापूर मतदारसंघात दोन वेगवेगळ्या उमेदवारी देण्याविरोधात नवी मुंबईच्या शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत नाईक कुटुंबीयांना दोन उमेदवारी दिल्यास पक्षाचे काम करणार नाही, असा इशारा देत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच सर्व काही शिंदेंना शह देण्यासाठी कटकारस्थाने रचली जात असल्याचा उल्लेखही नगरसेवकांनी केला. 

माजी आमदार संदीप नाईकांनंतर आता बुधवारी (ता.११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गणेश नाईक व माजी खासदार संजीव नाईक प्रवेश करण्याची शक्‍यता आहे. या प्रवेशानंतर नाईकांच्या घरात नवी मुंबईतील दोन्ही उमेदवारी जातील, अशी भीती शिवसेनेच्या नगरसेवकांना वाटत आहे. नाईकांनाचा पुन्हा संधी मिळाल्यास नवी मुंबईत वाढीस लागलेल्या शिवसेनेला अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तसेच मागील अनेक वर्षे नाईकांच्या विरोधात काम केल्यानंतर फक्त पक्ष अट्टहासासाठी त्यांच्या बाजूने काम करण्यास अनेक शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. रविवारी शहरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत नाईकांचे काम न करण्याचा निर्णय सर्व नगरसेवकांनी एकमताने घेतला होता. या बैठकीतील निर्णय एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मातोश्रीवर पोहोचवण्यासाठी नगरसेवकांनी शिंदेंची भेट घेतली. या भेटीत नाईकांविरोधात काम न करण्याची कारणे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी समजावून सांगितली. याउलट जर युतीतर्फे दोन्ही उमेदवारी नाईकांना दिली जाणार असतील तर गरज पडल्यास आमदार मंदा म्हात्रेंचे आम्ही काम करू, असा इशाराही नगरसेवकांनी दिला. शिंदेंनी या सर्व नगरसेवकांनी समजूत काढली. 

जागेचा तिढा
नवी मुंबईत एक जागा भाजपची आहे; तशी दुसरी जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे एका जागेवर शिवसेनेचा हक्क सोडणार नाही, असे शिंदेंनी स्पष्ट केले. तसेच नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना मातोश्रीवर पोहोचवण्याचे आश्‍वासन दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena councilors meets Eknath Shinde against the ganesh naik