नाईकांच्या प्रवेशास शिवसेना नगरसेवकांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नवी मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी नाईकांच्या भाजप प्रवेशास तीव्र विरोध केला आहे. रविवारी (ता.७) वाशीतील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीमध्ये सर्व नगरसेवकांनी एकमुखाने नाईकांचे काम न करण्याचा निर्धार केला आहे. 

नवी मुंबई : लांबणीवर पडलेल्या माजी मंत्री गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशात आता आणखी एक अडचण उभी राहिली आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत पदाधिकाऱ्यांनी नाईकांच्या भाजप प्रवेशास तीव्र विरोध केला आहे. संदीप व गणेश नाईकांचे निवडणुकीत काम करण्यास या नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नकार दिला आहे. रविवारी (ता.७) वाशीतील मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीमध्ये सर्व नगरसेवकांनी एकमुखाने नाईकांचे काम न करण्याचा निर्धार केला आहे. 

नाईकांमागे लागलेले शुक्‍लकाष्ट सुटायचे नाव घेत नाही. राज्यातून राष्ट्रवादीची सत्ता गेल्यानंतर महापालिकेतील सत्तेच्या जोरावर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असलेल्या गणेश नाईकांच्या वाटेत नवनवीन अडथळे उभे राहत आहेत. मुलगा संदीप नाईक व पुतण्या सागर नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर तब्बल एक महिना लोटूनही नाईकांच्या भाजप प्रवेशाचे भवितव्य अद्यापही अधांतरीच आहे. प्रसिद्धिमाध्यमांनी दिलेल्या ९ तारखेच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त हुकल्यानंतर आता ११ सप्टेंबरला गणेश नाईक समर्थकांसहित भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. 

परंतु त्याआधीच नवी मुंबईतील शिवसेनेच्या कडव्या विरोधकांनी नाईकांविरोधात दंड थोपटले आहेत. नगरसेवकांच्या या भूमिकेबाबत शिवसेनेच्या जिल्हापातळीवरील वरिष्ठ नेत्यांनीही सकारात्मक माना डोलवत पाठिंबा दिला आहे. युतीच्या जुन्या फॉर्मुल्याप्रमाणे ऐरोली मतदारसंघ शिवसेनेला; तर बेलापूर मतदारसंघ भाजपला दिला जातो; परंतु मध्येच नाईक कुटुंबीयांच्या प्रवेशामुळे दोन्ही मतदारसंघ नाईकांना जातील, अशी भीती शिवसेनेच्या नगरसेवकांना वाटत आहे. त्यामुळे एक मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची ठोस मागणी नगरसेवकांनी केली आहे.

...अन्यथा सामूहिक राजीनामे देणार
शिवसेना नगरसेवकांच्या वाशीत संपन्न झालेल्या बैठकीतील निर्णय ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंमार्फत मातोश्रीवर पोहोचवला जाणार आहे. त्यानंतरही मातोश्रीने नाईकांच्या प्रवेशाबाबत भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा न केल्यास सामूहिक राजीनामे दिले जातील. असा इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिला आहे.

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ गणेश नाईकांना दिले; तर शिवसेनेचे नगरसेवक राजीनामे देतील, अशी सर्व पदाधिकारी व नगरसेवकांची भूमिका आहे.
-विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena councilors protest against Naik's BJP entry