भाजपाला शह देण्यासाठी सेनेचा लोकोपयोगी कामाचा धडाका

महेश पांचाळ
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नोटाबंदीबाबत सुरुवातीला स्वागत करणाऱ्या जनतेत आता भाजपाविरोधात सूर ऐकायला मिळू लागला आहे. नरेंद्र मोदीच्या निर्णयानंतर 50 दिवसानंतर असंतोषांचे वातावरण कायम राहिल्यास भाजपासोबत जाणे सेनेला परवडणारे नाही, असे सेनेतील एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे. 

मुंबई - केंद्रात आणि राज्यात शिवसेना ही भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झालेली असली तरी, फेब्रुवारी, मार्च 2017 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जनतेसमोर जाताना शिवसेनेने निवडणुकीपूर्वी दिलेल्या जाहिरनाम्यातील लोकोपयोगी कामांच्या शुभारंभाचा धडाका लावण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मुंबई महापालिकेत भाजपही छोटा भिडू म्हणून सत्तेत असला तरी, शिवसेनेची वेगळी छाप दाखविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जाते. 

नोटाबंदीबाबत सुरुवातीला स्वागत करणाऱ्या जनतेत आता भाजपाविरोधात सूर ऐकायला मिळू लागला आहे. नरेंद्र मोदीच्या निर्णयानंतर 50 दिवसानंतर असंतोषांचे वातावरण कायम राहिल्यास भाजपासोबत जाणे सेनेला परवडणारे नाही, असे सेनेतील एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे. 

मुंबई महापालिकेचे विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात नव्या वैद्यकीय महाविद्यालयाचा लोकार्पण सोहळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, मुख्यमंत्री अनुपस्थित राहिले तरी, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी पार पडला. 

दहिसर येथील महापालिकेच्या प्रकल्प कार्यक्रमात एक महिन्यापुर्वी मुख्यमंत्र्यांना आणण्या आले होते. त्यावेळी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक सेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी निमंत्रण न देण्यावरुन सेना भाजपामध्ये जुंपली होती. मात्र, मुंबईतील तीन कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यानंतर भाजपाकडून सेनेला अडचणीत आणण्यात आघाडीवर असलेले खासदार किरीट सोमय्या आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार हे सध्या थंडावले आहेत. 

परंतु, सेनेने पुढील धोका ओळखून महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागेपर्यंत सर्व नगरसेवक आणि मुंबईतील शिवसेना आमदारांना आपल्या मतदारसंघातील अपूर्ण कामे पुर्ण करावीत, असे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आल्याचे समजते.

Web Title: Shiv Sena criticise bjp