गणेश नाईकांच्या प्रचाराबाबत शिवसेनेत दुमत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी नाईकांवर केलेली जहरी टीका आणि प्रचाराबाबत मातोश्रीवरून न आलेला आदेश; यामुळे नाईकांच्या प्रचार फेरीत शिवसेनेचे बरेचसे नगरसेवक व पदाधिकारी गायब झाल्याचे दिसून येत आहेत.

नवी मुंबई : भाजपचे ऐरोलीतील उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचाराबाबत ऐरोली मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. दादर येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी नाईकांवर केलेली जहरी टीका आणि प्रचाराबाबत मातोश्रीवरून न आलेला आदेश; यामुळे नाईकांच्या प्रचार फेरीत शिवसेनेचे बरेचसे नगरसेवक व पदाधिकारी गायब झाल्याचे दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी लावलेल्या बैठकीलाही शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी बेकायदेशीर ठरवत शिवसैनिकांना जाण्यास मनाई केली होती. त्यामुळे चौगुले व म्हात्रेंमध्ये झालेल्या वादातून म्हात्रे यांनी चौगुलेंविरोधात पोलिस तक्रार केली आहे.

काही महिन्यांपूर्वीच नाईक कुटुंब भाजपवासी झाल्यामुळे कट्टर शिवसैनिकांना एकेकाळचे विरोधक असणाऱ्या नाईकांचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रचार करावा लागणार आहे. ज्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली, अनेकदा शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीत आणले; त्यांचा प्रचार करण्याचा विचार अजूनही निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनात येत नाही. यादरम्यान दसरा मेळाव्यात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडूनच युतीच्या उमेदवारावर टीका होत असल्याने नवी मुंबईतील शिवसैनिकांना युतीधर्म न पाळण्यासाठी अनाहूतपणे पाठबळ मिळत आहे. तर बुधवारी (ता. ९) विजय चौगुले यांनी आयोजित केलेल्या बैठकीला प्रवीण म्हात्रे यांनी विरोध केल्याची घटना घडली. चौगुले यांना बैठकीचे अधिकार नसताना बैठक कशी आयोजित केली, असा प्रश्‍न म्हात्रे यांनी समाजमाध्यमांवर उपस्थित केला. तसेच प्रचाराच्या कामाबाबत स्पष्टता नसल्याचाही उल्लेख त्यांच्या व्हायरल झालेल्या संदेशात होता. म्हात्रे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांमागे अनेक नाराज शिवसैनिकांची खदखद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसैनिकांचा पाठिंबा नसणे नाईकांना महाग पडण्याची शक्‍यता आहे.     

प्रचाराचे आदेशच नाहीत
प्रचाराला विरोध नाही. मात्र, शिवसैनिक आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. पक्षात बैठक घेण्याचे अधिकार जिल्हाप्रमुख व शहरप्रमुखांनाच आहेत. विजय चौगुले यांनी आयोजित केलेली बैठक ही अवैध असल्याने, समाजमाध्यमांवर शिवसैनिकांना तशी माहिती दिल्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अशी माहिती शिवसेनेचे ऐरोली शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे यांनी दिली. 

दसऱ्या निमित्ताने सर्व शिवसैनिकांना जेवणासाठी बोलवले होते. हा आमचा कौटुंबिक सोहळा होता. याची कल्पनाही जिल्हाप्रमुखांना दिली होती. तसेच आपण स्वतः माजी जिल्हाप्रमुख आणि विद्यमान विरोधी पक्षनेता असताना बैठक बोलवण्याच्या अधिकाराबाबत मला कोणी शिकवू नये. आम्ही गणेश नाईकांचे प्रचाराचे काम करून युतीधर्माचे पालन करणार, कोणाला काय करायचे आहे; त्यांनी ते खुशाल करावे, मी कोणालाही धमकावलेले नाही. 
- विजय चौगुले, विरोधी पक्षनेते.

गणेश नाईकांच्या प्रचाराबाबत शिवसैनिकांमध्ये अजिबात संभ्रमाचे वातावरण नाही. विजय चौगुले आणि प्रवीण म्हात्रे या दोघांमध्ये झालेला वाद हा फक्त गैरसमजुतीतून झालेला वाद आहे. तो सामोपचाराने मिटेल. 
- द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख, शिवसेना.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena dissent about Ganesh Naik's campaign