नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला फायदा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित फायदा झाला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार खेडमध्ये नगराध्यक्षपदी निवडून आला आहे.

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित फायदा झाला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार खेडमध्ये नगराध्यक्षपदी निवडून आला आहे.

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणूक प्रचारात स्थानिक प्रश्‍नासोबतच केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या मुद्दा केंद्रस्थानी होता. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेने अत्यंत खुबीने नोटाबंदीच्या निर्णयावर भूमिका ठरविली होती. केंद्र आणि राज्यात सत्तेत असूनही शिवसेनेने नोटाबंदीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. याचा नगरपालिका निवडणुकीत अपेक्षित फायदा झाल्याचे दिसून येते. 2011मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे 264 नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये आता आता भरघोस वाढ झाली असून, सेनेच्या नगरसेवकांची संख्या तब्बल 402 इतकी झाली आहे. 2011च्या निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर होती, आताही पक्षाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, असे तरी नगरसेवकांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही शिवसेनेकडून हीच रणनीती आखण्यात येणार असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे.

लोकसभा आणि विधानसभेच्या 2014 मध्ये निवडणुकीत जबरदस्त पिछाडीवर गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नगरपालिका निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. गेल्या निवडणुकीत रत्नागिरीच्या खेड नगरपालिकेवर मनसेची सत्ता होती. यंदा तेथे मनसेचा नगराध्यक्ष निवडून आल्याने मनसेला एकुलत्या एक विजयावर समाधान मानावे लागले आहे. अन्य ठिकाणच्या नगरपालिकांत मनसेचे एकूण 12 नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेची अवस्था अत्यंत नाजूक झाल्याचे नगरपालिका निवडणुकीत दिसून आल्याने आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत पक्षाध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेतात, यावर पक्षाचे यश अवलंबून आहे.

Web Title: Shiv Sena gains in Civic body elections