शिवसेना सरकार हिंदुविरोधी, छटपूजेवरून भाजपची ठाकरे सरकारवर टीका

कृष्ण जोशी
Wednesday, 18 November 2020

आधीच वेळेत मागणी करूनही छटपूजा समुद्रकिनारी न करता कृत्रिम तलावात करा, असा शाहजोग सल्ला शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेने जेमतेम दोन दिवस आधी दिला, म्हणजेच यांना छटपूजा करूच द्यायची नव्हती, हेच दिसून येत आहे, अशी टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

मुंबई:  आधीच वेळेत मागणी करूनही छटपूजा समुद्रकिनारी न करता कृत्रिम तलावात करा, असा शाहजोग सल्ला शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेने जेमतेम दोन दिवस आधी दिला, म्हणजेच यांना छटपूजा करूच द्यायची नव्हती, हेच दिसून येत आहे, अशी टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 

सार्वजनिक ठिकाणी छटपूजेला परवानगी नाकारून कृत्रिम तलावात छटपूजेला परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने कालच जाहीर केला आहे. त्यावरून भातखळकर यांनी राज्य सरकारवर तसेच महापालिकेवर सडकून टीका केली आहे. छटपूजा येत्या शुक्रवारी होत असून खुद्द भातखळकर यांनीही मुख्यमंत्र्यांना 11 नोव्हेंबर रोजीच पत्र लिहून छटपुजेला संमती देण्याची मागणी केली होती. 

आधीच वेळेत मागणी करूनही छटपूजेला जेमतेम दोन दिवस उरले असताना उशिरा परवानगी नाकारण्यात आली. यातून शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेला छटपूजा करूनच द्यायची नाही हेच सिद्ध होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दुकानं, मॉल, हॉटेल, व्यायामशाळा, तरणतलाव या सर्वांनंतर आता सर्वात शेवटी मंदिरे उघडण्यात आली. ऐन दिवाळीत वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे भाडे कोट्यवधी रुपयांनी वाढविण्यात आले. वेळेत मागणी करूनही छटपूजेचा निर्णय उशिराने कळविण्यात आला. यावरून हे राज्य सरकार आणि शिवसेनेच्या ताब्यातील महापालिका हिंदू समाजविरोधी काम करत आहे का, अशी शंका येण्यास वाव आहे. त्यामुळे या सरकारचा आणि मुंबई महापालिकेचा भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करीत असल्याचेही भातखळकर यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्धीस दिलेल्या व्हिडियोमध्ये म्हटले आहे.

अधिक वाचा-  रुग्णालये, कोविड केअर केंद्रातील रुग्णसंख्येत घट; 66 टक्के बेड्स रिक्त

घरातच अर्ध्य देणार
 
तर 25 वर्षांनंतर आपण प्रथमच छटपूजेसाठी जुहू समुद्रकिनारी जाणार नसून मी घरातच कृत्रिम तलावात सूर्याला अर्ध्य देईन, असे माजी खासदार संजय निरुपम यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संकटकाळात भाविकांनी देखील गर्दीत नैसर्गिक जलसाठ्यांवर जाऊन पूजा करू नये. गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता असल्याने घराजवळची विहीर, तलाव येथेच पूजा करा किंवा घरीच सूर्याला अर्ध्य द्या. केवळ याच वर्षीचा हा प्रश्न आहे, पुढील वर्षी नेहमीप्रमाणेच छटपूजा करता येईल, असेही निरुपम यांनी ट्वीट करून सांगितले आहे. निरुपम यांच्यातर्फे दरवर्षी जुहू समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर छटपूजेचे आयोजन केले जाते.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Shiv Sena government anti Hindu BJP criticism Chhatpuja Accused deliberately delaying decision


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena government anti Hindu BJP criticism Chhatpuja Accused deliberately delaying decision