शिवसेनेत गटबाजीला उधाण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

नवी मुंबई - स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील आणि विरोधी पक्षाचे नेते विजय चौगुले यांच्यातील वाद शुक्रवारी सर्वसाधारण सभेत उफाळून आला. महापालिकेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत मांडताना केलेल्या भाषणात सभापती पाटील यांनी चौगुले यांचे नाव न घेतल्याने शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी सभात्याग केला; तर शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीतही शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी भाग घेतला नाही. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली. 

अंतर्गत गटबाजीमुळे महापालिकेची हाती येणारी सत्ता निसटल्यानंतरही शिवसेनेतील गटबाजी संपलेली नाही. विरोधी पक्षनेते चौगुले व स्थायी समिती सभापती पाटील यांच्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद शुक्रवारी उघड झाला. अर्थसंकल्प मांडताना पाटील यांनी चौगुले यांच्या नावाचा उल्लेख टाळल्यामुळे नाराज झालेल्या चौगुले यांनी महासभेच्या पुढील कामकाजात भाग घेतला नाही. चौगुले गटाच्या नगरसेवकांनी पक्षप्रतोद यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली. पाटील शिवसेनेचे असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. चौगुलेंच्या नावाचा उल्लेख टाळल्यामुळे नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी शुक्रवारी सभात्याग केल्याने चौगुले समर्थकांची नाराजी सभागृहातही दिसून आली. शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या कामकाजातही पाटील यांच्या विरोधातील नाराजीचा सूर कायम होता. शिवसेनेचे प्रशांत पाटील व जगदीश गवते यांनी स्थायी समितीच्या कामकाजात भाग घेतला नाही. पक्षाची भूमिका ठरवताना सभापती विश्‍वासात घेत नाहीत, असा आरोप पाटील व गवते यांनी केला. पाटील यांच्याविरोधात चौगुले गटातील नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नाराजी पोहोचली असून थेट राजीनामे देण्याची तयारीही केल्याचे एका नगरसेवकाने सांगितले. 

राजशिष्टाचारानुसार सभापतींनी विरोधी पक्षनेत्यांचे नाव घ्यायला हवे होते. सभापती शिवराम पाटील व विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यात काही गैरसमज झाले असतील ते पक्षाच्या पातळीवर सोडवण्यात येतील; परंतु यामुळे शिवसेनेचे नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. 
-द्वारकानाथ भोईर, पक्षप्रतोद, शिवसेना 

Web Title: shiv sena internal politics