नाशकातील तडजोड टाळण्यासाठी शिवसेनेचा मनसेला नकार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई - मुंबईत भाजपचा महापौर होऊ नये म्हणून महापालिकेच्या निवडणूक मैदानातून बाहेर पडण्याची तयारी मनसेने दाखवली होती, परंतु मनसेशी नाशिकमध्ये समझोता करावा लागेल या विचाराने शिवसेनेने मनसेची टाळी नाकारली अशी चर्चा आहे. 
आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, त्यामुळे कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केल्याने शिवसेना-मनसेच्या युतीला पूर्णविराम मिळाला आहे. 

मुंबई - मुंबईत भाजपचा महापौर होऊ नये म्हणून महापालिकेच्या निवडणूक मैदानातून बाहेर पडण्याची तयारी मनसेने दाखवली होती, परंतु मनसेशी नाशिकमध्ये समझोता करावा लागेल या विचाराने शिवसेनेने मनसेची टाळी नाकारली अशी चर्चा आहे. 
आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत, त्यामुळे कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केल्याने शिवसेना-मनसेच्या युतीला पूर्णविराम मिळाला आहे. 

मनसेचा कठीण काळ सुरू आहे. मुंबईत त्यांचे 28 नगरसेवक असले, तरी निवडणुकीनंतर ही संख्या पाच-सातवर आली तर आश्‍चर्य वाटणार नाही अशी परिस्थिती आहे. मनसे आणि शिवसेनेची व्होट बॅंक समान असल्याने हजार-दीड हजार मते मनसेला मिळाली, तरी त्याचा फटका थेट शिवसेनेलाच बसला असता. त्यामुळे अशा अटीतटीच्या लढाईत भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्‍यता आहे. फक्त भाजपला मुंबईत रोखण्यासाठी मनसेने शिवसेनेला साथ देण्याची इच्छा व्क्त केली होती. वेळ पडल्यास मुंबईत एकही जागा न लढवण्याची मनसेने तयारी केली होती, परंतु मुंबईत मनसेची मदत घेतल्यास त्याचा फायदा त्यांना नाशिकमध्ये होऊ शकेल, या विचाराने शिवसेनेने मनसेशी युती करण्यास नकार दिला असावा, असे सांगण्यात येते. 
नाशिकमध्ये मनसेची सत्ता आता कागदावरच आहे. महापौरांसह अनेक नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे शिवसेनेला तेथे सत्ता मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत समझोता करून नाशिकमध्ये मनसेविरोधात निवडणूक लढवणे शिवसेनेला अवघड झाले असते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच मनसेच्या टाळीला प्रतिसाद दिला नाही असे सांगण्यात येते. 

स्वबळावर... 
मनसेच्या प्रस्तावाबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, "अजून कोणताही प्रस्ताव आला नाही. शिवसैनिक पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. महाराष्ट्रभर भगवा फडकवण्याचा चंग त्याने बांधला आहे. स्वबळावर हे स्वप्न साकारण्यासाठी तो समर्थ आहे.' त्यांचे हे वक्तव्य मनसेशीही युती करणार नसल्याचे संकेत आहेत. मनसेचे मालाड येथील नगरसेवक दीपक पवार यांनी आज उद्धव यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आतापर्यंत मनसेच्या मुंबईतील चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

मनसेचे लक्ष्य भाजपच 
शिवसेनेने युतीसाठी हात पुढे केला नसला, तरी मनसे या निवडणुकीत भाजपलाच लक्ष्य करणार आहे. त्यासाठी राज्यातील भ्रष्टाचाराबरोबरच भाजपच्या एकाधिकारशाहीवर हल्ला चढवण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर मुंबईच्या विकासाचा मुद्दाही मांडण्यात येणार आहे.

Web Title: Shiv Sena MNS refused to compromise in order to avoid nashik