शिवसेना खासदार गावित यांच्या वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी जॉर्ज पॉल डिसोझा या वाहनचालकाला अटक केली आहे.

मुंबई : शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या वाहनाच्या धडकेने बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील हरणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 2) उघड झाली. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी जॉर्ज पॉल डिसोझा या वाहनचालकाला अटक केली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून मुंबई महापालिकेच्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्रमार्गे थेट पूर्व उपनगरात जाता येते. पश्‍चिम उपनगरातील लोकप्रतिनिधी पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडून परवानगी दिली जाते. हा रस्ता संरक्षित असल्याने वाहनांवर ताशी 20 किलोमीटर वेगमर्यादा घालण्यात आली आहे; परंतु अनेक वेळा लोकप्रतिनिधींचे वाहनचालक त्याचे पालन करत नाहीत. 
पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित मिरा रोड येथे राहतात. त्यामुळे ते नेहमीच या रस्त्याचा वापर करतात. सायंकाळी राष्ट्रीय उद्यानातून जात असताना त्यांच्या वाहनाची (क्र. एमएच 48-बीएच-9909) एका हरणाला धडक लागली. या अपघाताची माहिती वाहनचालकाने सुरक्षा रक्षकांना दिली.

रुग्णालयात नेले जात असतानाच जखमी हरणाचा मृत्यू झाला. ही गाडी भरधाव जात असल्याचा आरोप होत आहे. या वाहनात खासदार गावित नव्हते, असा दावा मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांनी केला. हे वाहन जप्त करण्यात आले असून, चालक जॉर्ज डिसोझा याला वन्यजीव संरक्षण कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. 

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुक्तपणे फिरणाऱ्या प्राण्यांच्या जिवाला धोका होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते. उद्यानातील रस्त्यांवर ताशी 20 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवू नयेत, असे आवाहन करण्यात आले असून, तसे फलक लावण्यात आले आहे. या अपघातानंतर संबंधित वाहन चालकावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. 
- अन्वर अहमद, मुख्य वन संरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena MP Gavit dies after being hit by a vehicle