शिवसेनेतील दुफळी पुन्हा उघड

शिवसेनेतील दुफळी पुन्हा उघड

नवी मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतरही शिवसेनेतील नेत्यांचे आपापसातील वैर अद्याप संपलेले नाही. महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासोबत संपन्न झालेल्या बैठकीत शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. या भेटीदरम्यान विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या पाठोपाठ विठ्ठल मोरे आणि द्वारकानाथ भोईर या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी पाठ फिरवल्याने गटबाजी अधोरेखित झाली. 

बेलापूर मतदारसंघातून शिवसेनेला विजय नाहटा यांच्या रूपाने तिकीट नाकारल्यानंतर सध्या निष्ठावंत विरोधात उपरे असे शीतयुद्ध सध्या शिवसेनेत पाहावयास मिळत आहे. एकेकाळी विजय चौगुले विरोधात नाहटा अशा उमटणाऱ्या सुरात, आता एकेकाळी नाहटांच्या जवळचे मानले जाणाऱ्या विठ्ठल मोरेंच्याही नावाचा समावेश झाला आहे. महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर प्रभागरचना, स्थानिक प्रश्‍न व समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी नाहटांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या बैठकीत ही गटबाजी सर्वांनी अनुभवली. मिसाळ यांच्यासोबत चर्चेसाठी रविवारपासून शिवसेनेच्या नेतेमंडळींकडून आमंत्रणे देण्यात आली होती.

मात्र यात विठ्ठल मोरेंच्या नावाऐवजी द्वारकानाथ भोईर यांचे नाव टाकलेले पाहून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. त्यामुळे आज मिसाळ यांच्यासोबत संपन्न झालेल्या बैठकीला बेलापूर विभागातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच नगरसेवक उपस्थित होते. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा प्रचार करताना काही निष्ठावंतांनी घड्याळ अथवा इंजिन या संदेशाची पायमल्ली केल्यामुळे ही दुफळी ओढवल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये रंगली आहे. याबाबत नाहटा यांनी अधिक बोलण्याचे टाळले. 

ज्यांना शिवसेनेची कार्यपद्धती, धोरण आणि आचारविचार, संस्कार माहीत नाहीत, त्यांच्याबद्दल माझ्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकाने दखल घेण्याची गरज नाही. जिल्हाप्रमुख म्हणून बैठक घेण्याचा मला अधिकार असताना उपनेत्यांनी मला अशा प्रकारे डावलून बैठक बोलावणे हे चुकीचे आहे, एकवेळ मी उपनेत्यांना न सांगता बैठक बोलावू शकतो. त्यांना मला सांगण्याची गरज नाही. मला साधे आमंत्रण दिलेले नाही. बैठकीचे माझ्या कानावर घालणे आवश्‍यक होते. 
- विठ्ठल मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख. 


शहरप्रमुख मला बैठक बोलवण्याचा अधिकार आहे, त्यानुसार मी आयुक्तांसोबत भेटीचे आयोजन केले होते. यात उपनेते विजय नाहटा यांना आमंत्रण केले होते. याआधीही जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरेंनी आम्हाला डावलून मध्यवर्ती कार्यालयात बैठका बोलावल्या आहेत. त्या बैठकींना आम्हीसुद्धा हजेरी लावलेली आहे. 
- विजय माने, शहरप्रमुख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com