
ShivSena Row: शिवसेना भवनही ठाकरेंच्या हातून जाणार का? धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल
मुंबई : निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला झटका दिल्यानंतर आता शिवसेना भवनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्याच अनुषंगानं आता शिवेसना भवनाविरोधात आणि ज्या शिवाई ट्रस्टच्या जागेवर हे भवन उभं आहे त्या ट्रस्टविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. योगेश देशपांडे यांच्या फर्मनं ही तक्रार दाखल केली आहे. (Shiv Sena Row Filed complaint with charity Commissioner against Shiv Sena Bhavan and Shivai Trust)
एखाद्या राजकीय पक्षाला ट्रस्ट जागा वापरायला का दिली? असा सवालही आपल्या तक्रारीत फर्मनं केला आहे. तक्रारीत असंही म्हटलंय की, शिवाई ट्रस्ट हे एक पब्लिक ट्रस्ट असताना शिवसेना भवनाचा दुरुपयोग का करण्यात आला? जर ही पब्लिक ट्रस्ट आहे आणि जर त्याच्या नावावर ही शिवसेना भवनाची जमीन आहे. तर या सेनाभवनात एका राजकीय पक्षाला इतकी वर्षे ही वास्तू का वापरु दिली गेली?
ही माहिती गोपनिय का ठेवली?
तक्रारदार योगेश देशपांडे म्हणतात, "आत्तापर्यंत याची सर्व माहिती गोपनिय ठेवण्यात आली होती. सर्वसामान्यांचा असा समज होता की, ही शिवसेनेची प्रॉपर्टी होती. पण ही शिवाई ट्रस्टची जागा आहे. जर ही पब्लिक ट्रस्टची जागा असेल तर ती भाड्यानं देता येत नाही. जर शिवसेनेला ही जागा भाड्यानं दिली असेल तर याची संबंधित विभागाकडून परवानगी घेतली होती का? तसेच ही परवानगी का दिली? कुठल्या कायद्यांतर्गत त्यांना ही परवानगी देण्यात आली? असे प्रश्न उपस्थित होतात. हे सर्व अनैतिकच नव्हे तर बेकायदेशीर आहे. शिवसेना भवन ठाकरे गटाला मिळणार की शिंदे गटाला हा यातला मुद्दा नसून खरंतर हे कोणालाच मिळता कामा नये," असंही देशपांडे यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाचा खुलासा
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले, "याबाबतचे सर्व खुलासे आम्ही जिथे करायचे तिथे केलेले आहेत. याबाबतीत तक्रार आली तर त्याची योग्य त्या कायदेशीर मार्गानं उत्तर दिलं जाईल. याबाबत स्पष्टीकरण आम्हाला विचारायचं कोणी? हा एक प्रश्न आहे. कारण याबाबतची तक्रार स्विकारणारी एक व्यवस्था असते तिच्याकडे त्यांनी खुलासा मागावा. आम्हाला प्रत्येक जण येऊन विचारेल त्या प्रत्येकाला उत्तर देणं आम्हाला बंधनकारक नाही. आम्हाला संबंधित यंत्रणा प्रश्न विचारेल तेव्हा आम्ही त्यांना उत्तर देऊ. शिवसेना भवन ही वास्तू कायदेशीर मार्गानं बांधलेली असल्यानं इतकी वर्षे उभी आहे. याबाबाबत कोण काणाला किती भाडं देतं? हा जनतेचा प्रश्न नाही. तिथं कार्यालय सुरु आहे तिथं सामाजिक काम चालतं हे जगासमोर आहे.
कोण आहेत शिवाई ट्रस्टचे सदस्य?
या शिवाई ट्रस्टचे अध्यक्ष लीलाधर डाके, तर सदस्यपदी रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, विशाखा राऊत, सुभाष देसाई, दिवाकर रावते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहेत.