शिवसेनेचे लक्ष्य चार महापालिका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील 10 महापालिकांपैकी शिवसेनेने चार महापालिकांमध्ये लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाण्यातील वर्चस्व कायम राहावे म्हणूनच शिवसेनेने युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. 

मुंबई - राज्यातील 10 महापालिकांपैकी शिवसेनेने चार महापालिकांमध्ये लक्ष केंद्रित केले आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाण्यातील वर्चस्व कायम राहावे म्हणूनच शिवसेनेने युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. 

शिवसेना मुंबई, ठाणे कोणत्याही परिस्थितीत हातून जाऊ देणार नाही. त्यामुळेच शिवसेनेने मुंबई, ठाण्यात जास्त जागा मागू नका. इतर ठिकाणी तुम्हाला हवी तशी युती करू, असा प्रस्ताव भाजपसमोर मांडला होता. मात्र, भाजपने मुंबईत 114 जागा मागितल्यामुळे युती तुटली. मुंबई, ठाण्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे आणि उल्हासनगरलाही शिवसेनेचा महापौर आहे. नाशिक महापालिकाही शिवसेनेच्या ताब्यात येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिवसेनेने या चार महापालिकांमध्येच लक्ष केंद्रित केले आहे. ठाणे वगळता उर्वरित तीन महापालिकांमध्ये शिवसेनेला भाजपचेच आव्हान आहे. अशा परिस्थितीत हातात नसलेल्या महापालिकांच्या मागे लागून मुंबई गमावण्याऐवजी चार महापालिकांमध्येच सर्व शक्ती जुंपण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. 

पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती व नागपूर या पालिकांमध्ये शिवसेनेला फारशा अपेक्षा नाहीत. तेथे सत्तास्थापनेपेक्षा सध्याचे संख्याबळ वाढवण्याकडेच या पक्षाचा कल असेल. या सहापैकी दोन महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत आणि पुणे, पिंपरी-चिंचवड या ठिकाणी सत्ता मिळवण्यासाठी या पक्षाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या सहा महापालिकांमध्ये शिवसेनेशिवाय सत्तेची गणिते जुळवता येणार नाहीत, अशी तयारी करण्यात आली आहे. 

-मुंबई, ठाणे, उल्हासनगरमध्ये शिवसेनचा महापौर आहे. 
- पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महापौर आहे. 
- अकोला व नागपूरमध्ये भाजपचा महापौर आहे. 
- सोलापूरमध्ये कॉंग्रेसचा महापौर आहे. 

Web Title: Shiv Sena targets four municipal