भाजपला धोबीपछाड देण्यासाठी शिवसेनेचे 'गुजराती कार्ड' 

`Shiv Sena
`Shiv Sena

'जय महाराष्ट्र' म्हणून नेहमीच मराठी अस्मितेचे राजकारण करणारी शिवसेना आता प्रथमच गुजराती भाषकांना मोठ्या प्रमाणात तिकिटे देणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नाकावर टिच्चून मुंबई महापालिकेवरील भगवा स्वबळावर टिकवायचा असल्याने शिवसेनेने या गनिमीकाव्याचे नियोजन केले असल्याची चर्चा आहे. 

मुंबईतल्या अनेक भागांत गुजराती भाषकांची संख्या लक्षणीय आहे. या भागांमध्ये यापूर्वी भाजपचे उमेदवार एक गठ्‌ठा मतदानाने निवडून येत होते. अशा भागांमध्येच शिवसेना भाजपला आव्हान देणार आहे. त्याकरिता शिवसेनेने मोठ्या प्रमाणात गुजराती भाषक कार्यकर्त्यांना शिवसेनेत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने बोरिवलीत हंसा देसाई या गुजराती महिलेला उमेदवारी दिली होती. तर राजूल पटेल यांचा वॉर्ड बदलल्याने त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. मात्र या वेळी मुलुंड, घाटकोपर, बोरिवली, ठाकूरद्वार, चंदनवाडी आणि मलबार हिल या गुजरातीबहुल भागांत गुजराती भाषक उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. त्यानुसार गुजराती भाषकांना पंधरा ठिकाणी शिवसेना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. 

मुंबईमध्ये जवळपास 30 लाख गुजराती मतदार आहेत. ही मते परंपरेने भाजपच्या पारड्यात जात होती. या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पकड मजबूत आहे. मात्र, हीच पकड ढिली करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी गुजराती भाषकांना संधी देण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्याचे गुजराती समाजाचे नेते हेमराज शहा यांनी सांगितले. भाजप सरकारने नोटाबंदी केल्याने मुंबईतल्या गुजराती समाजातील व्यापाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांत अतोनात नुकसाने झाले असून नोटाबंदीचा सर्वाधिक फटका सोने, चांदी व्यापाऱ्यांना बसला. या व्यवसायाशी संबंधित असलेल्या गुजराती सोनी समाजाच्या संघटनेने भाजपच्या विरोधात मतदान करण्याचा फतवा काढला असल्याची माहितीही शहा यांनी दिली. मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन, भाजपच्या महाराष्ट्र गुजराती सेलचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक मंगल भानुशाली, काँग्रेसमधील गुजराती भाषिक कार्यकर्ते भरत दनानी यांनीही शिवसनेनेत प्रवेश केल्याने गुजराती भाषकांची मते यावेळी मोठ्या प्रमाणात सेनेला मिळण्याची शक्‍यता आहे. मुंबईतील किमान 40 वॉर्डांमध्ये गुजराती मतांची भुमिका निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. नेमकी किती तिकीटे गुजराती भाषिकांना देणार हे अधिकृतरित्या सेनेकडून जरी सांगण्यात आले नसले, तरी गुजरातीबहुल भागातील शिवसैनिकांचे मन वळवण्याची प्रक्रिया जाणीवपुर्वक सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com