'तर, शिवसेना महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घालेल'; संजय राऊतांची कडक शब्दात टीका

तुषार सोनवणे
Friday, 4 September 2020

यात तिने म्हटलंय की ती मुंबईत येणार आहे कोणामध्ये हिंमत असेल तर थांबवून दाखवा. यावर पुन्हा खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दांत उत्तर दिले आहे.

मुंबई - मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौतला समाजमाध्यमांवर टीकेच धनी व्हावं लागलंय. बॉलिवूड सेलिब्रिटी, मराठी कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सगळ्यांनीच कंगनाच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत तिला चांगलंच सुनावलं. खूप ट्रोल झाल्यानंतर आता तिने याबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे. यात तिने म्हटलंय की ती मुंबईत येणार आहे कोणामध्ये हिंमत असेल तर थांबवून दाखवा. यावर पुन्हा खासदार संजय राऊत यांनी कडक शब्दांत उत्तर दिले आहे.

कंगना रनौत म्हणाली, मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर.. - 

अभिनेत्री कंगना रनौत बॉलीवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्या सोशल मिडियावर खूप ऍक्टीव्ह असतात. ती अनेक मुद्द्यांवर तिची प्रतिक्रिया देत असते. नुकतंच कंगना आणि संजय राऊत यांच्यात ट्विटर वॉर सुरु होतं. यावेळी तिने म्हटलं होतं की तिला मुंबई पोलिसांची भिती वाटते. यावर संजय राऊत यांनी तिला प्रत्युत्तर देत म्हटलं होतं की जर तिला मुंबईमध्ये भिती वाटते तर तिने परत येऊ नये. राऊत यांच्या या वक्तव्यावर कंगनाने उत्तर देत म्हटलं की मुंबई POK सारखी का वाटतेय? तिच्या या स्टेटमेंटनंतर तिच्यावर चारही बाजुने हल्ला होऊ लागला. सोशल मिडियावर तिच्याविरोधात ट्विट्स केले जाऊ लागले. या सगळ्यावर आता कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की 'मी पाहतेय की बरेचसे लोक मला मुंबईत परत न येण्याची धमकी देत आहेत. म्हणून मी ठरवलं आहे की येणा-या आठवड्यात ९ तारखेला म्हणजेच ९ सप्टेंबरला मी मुंबईला जाईन. त्यावेळी मी एअरपोर्टला पोहोतल्यावर पोस्ट करेन. कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला अडवून दाखवावं. ' सोशल मिडियावर कंगनाचं हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तिचे चाहते तिला यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.   

कंगणाच्या मुंबईत परत येण्याच्या ट्वीटनंतर खासदार राऊत यांनी पुन्हा कडक भाषेत ट्वीट केले आहे. ते म्हणतात की, मुंबई ही मराठी मानसाच्या बापाचीच आहे... ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा... शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहणार नाही.

संजय राऊत आणि कंगणा रनौत यांच्यातील ट्वीट वार आता समाजमाध्यमांवरील ट्रेंड बनले आहे. याच मुद्द्याच्या चर्चा सुरू आहेत. आता कंगणा पुन्हा संजय राऊतांच्या ट्वीटला उत्तर देते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena will pay homage to such Maharashtra enemies; Sanjay Raut uttered harsh words