Mumbai: शिवसेनेच्या त्या देखाव्यावरुन आता राष्ट्रवादीच्या आव्हाडांचे ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp CM shinde

Mumbai: शिवसेनेच्या त्या देखाव्यावरुन आता राष्ट्रवादीच्या आव्हाडांचे ट्विट

डोंबिवली - शिवजयंतीला डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने 350 वर्षानंतर तोच योग या आशयाचा देखावा रेखाटण्यात आला होता. यामध्ये एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी माता भवानी तलवार भेट देत आहे,

तर दुसरीकडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती धनुष्यबाण सुपूर्द करीत असतानाचे चित्रण दाखविण्यात आले आहे. या देखाव्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला ट्रोल केले जात आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी अति उत्साही कार्यकर्त्यांना आवरा...शिवप्रभू एकमेव होते, आहेत

आणि राहतील असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांना ट्विट द्वारे दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्या देखाव्यावर ट्विट करत शिवसेनेचा समाचार घेतला आहे. एका ऐतिहासिक घटनेचे विद्रुपीकरण...ते पण इतके, महाराष्ट्रात काय सुरु आहे असे ट्विट त्यांनी करत सवाल उपस्थित केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती शिवसेनेच्या वतीने नुकतीच धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. यावेळी डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या बाहेर साकारण्यात आलेल्या देखाव्याचीच चर्चा सर्वत्र सुरु झाली.

‘350 वर्षानंतर .. पुन्हा तोच योग' या आशयाच्या या देखाव्यात एका बाजूला भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना तर दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे हे एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण सुपूर्द करताना देखाव्यात दाखवण्यात आलं होतं.

देखाव्याच्या माध्यमातून थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी मुख्यमंत्री शिंदे यांची तुलना केली गेली असल्याचा आरोप राजकारण्यांकडून होऊ लागला आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सर्वप्रथम यावर ट्विटच्या माध्यमातून सवाल उपस्थित केला.

“कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं.अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील... दरम्यान या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टॅग केलं आहे.

अती उत्साही कार्यकर्त्यांना आवरा असा सल्ला ही मनसे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना देऊ केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाचीतुलना करणं चूक असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमधून अधोरेखित केलं आहे..

त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील डोंबिवलीतील त्या देखाव्याचा फोटो ट्विट करत महाराष्ट्रात काय चालू आहे असा सवाल उपस्थित केला आहे. आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे,

तुलना तर सोडाच... थेट छत्रपती शिवाजी महाराजच... अरे काय चालू काय आहे महाराष्ट्रात. विद्रुपीकरण एका ऐतिहासिक घटनेचे.ते पण इतके. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किव्हा शिवसेनेच्या नेत्यांकडून काय उत्तर येते हे पाहावे लागेल....