शिवाजी पार्कवर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे कोर्ट नाराज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

मुंबई - शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे; शिवसेना-मनसे किंवा अन्य कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही. त्यावर नागरिकांचाच अधिकार आहे, असे सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कवर सतत होणाऱ्या कार्यक्रमांबाबत चिंता व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांबरोबरच येथील नागरिकांना त्रास होणार नाही आणि शिवाजी पार्क मैदान खराब होणार नाही, अशी व्यवस्था राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6 डिसेंबर) लाखो अनुयायी शिवाजी पार्कवर येतात. त्यासाठी पालिकेने मैदानावर मंडप घालणे व अन्य कामे सुरू केली आहेत. त्यामुळे स्थानिकांनी आक्षेप घेणारा अर्ज न्यायालयात केला होता. न्या. व्ही. एम. कानडे यांच्या खंडपीठापुढे या अर्जावर सुनावणी झाली. देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी महापरिनिर्वाणदिनी येथे येतात. त्यामुळे पालिकेने लवकर तयारी करण्यास सुरवात केली आहे, असा खुलासा पालिकेने केला. त्यावर दरवर्षी अशा प्रकारे गर्दी होते. त्यामुळे सरकार आणि पालिकेने पर्यायी जागेचा विचार करावा, तसेच पालिका व वाहतूक व्यवस्थेवर येणारा ताणही या वेळी वाढत असल्याने उपाययोजना करायला हव्यात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. शिवाजी पार्क मुलांच्या खेळण्यासाठी आहे; मात्र राजकीय पक्षांचे मेळावे, गणेश विसर्जन, दुर्गापूजा आदी कार्यक्रमांमुळे मैदानात मुलांना खेळता येत नाही, अशी नाराजीही न्यायालयाने व्यक्त केली. राज्य सरकार आणि पालिकेने समिती नेमून पुढील सुनावणीच्या वेळी तपशील द्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. 

Web Title: Shivaji Park on the events unwilling Court