शिवनेरी, अश्‍वमेधचा प्रवास  आरोग्यासाठी धोक्‍याचा 

शिवनेरी, अश्‍वमेधचा प्रवास  आरोग्यासाठी धोक्‍याचा 

मुंबई - मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवनेरी आणि अश्‍वमेध बसगाड्यांत श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्याचे समजते. बसमधील अस्वच्छता आणि एसीच्या दूषित हवेमुळे प्रवाशांना नाकावर रुमाल बांधून बसावे लागते, असेही सांगण्यात आले. 

एसटी महामंडळाची सर्वांत आकर्षक आणि उच्च दर्जाची सेवा अशी शिवनेरी आणि अश्‍वमेध बसगाड्यांची ओळख आहे. परंतु या बसगाड्या प्रवाशांच्या आरोग्यासाठी बाधक असल्याचा आरोप केला जात आहे. मुंबई-पुणे मार्गावर नियमीत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये श्‍वासोच्छ्वासाला त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. 

शिवनेरी आणि अश्‍वमेध सेवेतील 135 बसगाड्यांपैकी 35 बसगाड्या खासगी मालकीच्या आहेत. खासगी गाड्यांची देखभाल-दुरुस्ती संबंधित कंपनी करते, एसटी महामंडळाने बसगाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे, असे यंत्र अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तिकीट दर महागडे असले, तरी या बसगाड्यांत अस्वच्छता असते, आसनेही घाणेरडी असतात. त्या तुलनेत कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांत चांगल्या सोईसुविधा असल्यामुळे शिवनेरी आणि अश्‍वमेध सेवेतील प्रवाशांची संख्या कमी झाली होती, असे सांगण्यात आले. 

शिवनेरी, अश्‍वमेध सेवेतील बसगाड्यांमध्ये प्रवाशांना श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याची समस्या पहिल्यांदा ऐकायला मिळत आहे. यापूर्वी अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. यासंदर्भात यंत्र अभियांत्रिकी विभागाशी बोलावे लागेल. 
- राहुल तोरो, वाहतूक महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ 

बसगाड्यांमधील एसी यंत्रणेची देखभाल झाली नसल्यास प्रवाशांना सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो. दमा असलेल्या प्रवाशांचा त्रास वाढण्याची शक्‍यता असते. असा प्रकार प्रत्येक बसमध्ये असण्याची शक्‍यता वाटत नाही. 
- डॉ. अरविंद काटे, छातीरोगतज्ज्ञ 

दैनंदिन फेऱ्या 
दादर-पुणे रेल्वेस्थानक : 44 
पुणे रेल्वेस्थानक-दादर : 52 
दादर-स्वारगेट : 22 
ठाणे-स्वारगेट : 27 
स्वारगेट-ठाणे : 16 
बोरिवली-स्वारगेट : 15 
स्वारगेट-बोरिवली (सायनमार्गे) : 24 
स्वारगेट-बोरिवली (ऐरोलीमार्गे) : 14 
औरंगाबाद-शिवाजीनगर : 12 
शिवाजीनगर-औरंगाबाद : 12 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com