शिवसेनेच्या 32 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

सेनेतील कार्यकर्त्यांना मतभेदांचे ग्रहण!
भाजपसह शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मतदारसंघातील प्रमुख पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी विविध रणनीती आखण्याची तयारी करत असताना महापालिका निवडणुकीत एकही नगरसेवक निवडून आणण्यात अपयशी ठरलेल्या सेनेमधील कागाळ्या कमी होण्याऐवजी वाढल्या असल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना भाजपच्या मदतीने तालुक्‍यातून भरघोस मतदान मिळवून देण्यात येथील शिवसेना कार्यकर्ते यशस्वी ठरले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी मात्र त्याच सेनेतील कार्यकर्त्यांना मतभेदांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे.

पनवेल - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पनवेलमधील शिवसेना पक्षात गटबाजीला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून नव्याने पद बहाल करण्यात आल्याने आपल्यावर अन्याय करण्यात आल्याच्या भावनेने शिवसेनेच्या ३२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे पाठवला असल्याची माहिती कळंबोली उपविभागप्रमुख महेंद्र पवार यांनी दिली आहे.

राजीनामा दिलेल्यांमध्ये सेनेचे कळंबोली शहरप्रमुख अविनाश कोंडिलकर यांचाही समावेश आहे. कोंडिलकर यांच्या पदावर नीलेश भगत यांची शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याने कोंडिलकर यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये कोंडिलकर यांच्यासह उपशहर प्रमुख सचिन मोरे, शहर संघटक विवेक गडकरी, उपशहर प्रमुख अविनाश पाटील, विभागप्रमुख घनशाम नाईक, विभागप्रमुख संभाजी चव्हाण, विभागप्रमुख विश्‍वास पेटकर, शिरीष सावंत, नीलेश घुले या प्रमुख पदाधिकऱ्यांचाही समावेश आहे. विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने तालुक्‍यातील प्रत्येक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena 32 Office Bearer Resign Politics