मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटाबंदीत; शिवसेनेचा घरचा आहेर

noteban
noteban

मुंबई : आर्थिक मंदी आणि त्यातून निर्माण झालेला भ्रष्टाचाराचा भस्मासुर आहे. पुन्हा बेरोजगारी थैमान घालतेच आहे. मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटाबंदीच्या निर्णयात आहे. नोटाबंदीत अनेकांचा काळा पैसा मोठ्या प्रमाणात पांढरा झाला हे मान्य केले पाहिजे, पण कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या गमावल्या हेसुद्धा कटू सत्य आहेच, असा घरचा आहेर शिवसेनेने भाजपला दिला आहे. 

देशात मंदीचे वातावरण असून, अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अनेक क्षेत्रात आर्थिक स्थिती हालाखीची आहे. यावरून शिवसेनेने या सर्व गोष्टीला नोटाबंदीचा निर्णय कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे मोदींवरच शिवसेनेने पुन्हा एकदा टीका केली आहे. शिवसेनेने 'सामना' या मुखपत्रातील अग्रलेखातून अर्थव्यवस्था, सरकारी इतमामात अंत्यसंस्कार असे म्हटले आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, ''नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. अर्थमंत्र्यांनी अत्यंत धाडसाने सत्य सांगितले आहे. आजार लपवला तर उपचार करता येणार नाही. आजार लपवणारा रोगी शेवटी मरण पावतो. देशात दोन गोष्टींनी थैमान मांडले आहे. नोटाबंदी ज्यांच्या कारकीर्दीत झाली ते अर्थमंत्री अरुण जेटली दिल्लीच्या रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत आहेत व एक आणखी माजी अर्थमंत्री चिदंबरम हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेले आहेत, पण सीतारमण सांगतात तो भ्रष्टाचार नोटाबंदीनंतरचा, म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांतला आहे. हा भ्रष्टाचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरे झाले असते.'' 

मोदी पुन्हा जिंकले असले तरी देशाची आर्थिक स्थिती स्फोटक झाली आहे. पंतप्रधान मोदी हे भ्रष्टाचाराची ‘पै-पै’ वसूल करण्याची भाषा करतात तेव्हा गर्वाने छाती फुलून येते. पण चिदंबरम यांचे पाप मागच्या सरकारातले आहे व सीतारमण म्हणतात तो नोटाबंदीनंतरचा भ्रष्टाचार सध्याच्या राजवटीतला आहे. नव्या राजवटीत परदेशातला काळा पैसा स्वदेशात आला नाही. उलट बँका बुडवणारे शंभरावर उद्योगपती पळून गेले. मोदी यांनी ‘नवा भारत’ म्हणजे ‘Modern India’ची घोषणा केली तो ‘भारत’ सगळ्यांची काळजी घेणारा असावा हे स्वप्न होते, पण नव्या भारतात गेल्या दोन वर्षांत दोन कोटींवर लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. बेकारी वाढली. लोकांच्या घरांतील चुलीही विझल्या. मोठे उद्योग बंद पडले व ‘टपरी’ चालवून दोन घास खाणाऱ्यांचेही हाल झाले. अर्थव्यवस्थेला मारलेला हा लकवा नवा भारत कसा निर्माण करणार? देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत काय? ते लवकरच दिसेल, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com