चैत्यभूमीवरील कार्यक्रमांपासून शिवसेना दूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

मुख्यमंत्र्यांची "फडणवीसी' खेळी; तयारीसाठी अचानक घेतली बैठक

मुख्यमंत्र्यांची "फडणवीसी' खेळी; तयारीसाठी अचानक घेतली बैठक

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी परिसरात होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन महापालिका करते. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी महापालिका अधिकारी आणि समन्वय समितीची बैठक घेऊन शिवसेनेला या कार्यक्रमापासून लांब ठेवण्यास सुरुवात केली. त्याबाबत महापौरांनी नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्री राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. भाजपची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने आता महापरिनिर्वाण दिन आणि डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी "ड्राय डे' जाहीर करण्याची मागणी केली आहे.

डॉ. आंबेडकर यांचा 6 डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिन आणि 14 एप्रिलला जयंतीनित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन, तसेच तिथे येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था महापालिकेमार्फत केली जाते. प्रथेनुसार दरवर्षी महापौर समन्वय समिती आणि प्रशासनाची बैठक घेतात. मात्र, यंदा प्रथमच महापौरांच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीला पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासह पोलिस अधिकारी, सामाजिक न्याय विभाग, तसेच समन्वय समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण नियोजनाचा खर्च पालिकेमार्फत केला जातो. मुख्यमंत्री राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रकार लोकशाहीला पूरक नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेली बौद्ध महासभा ही संस्था चैत्यभूमीची देखभाल करते. या संस्थेलाही या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले होते. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी "ड्राय डे' जाहीर करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असून राज्य सरकारने ती तत्काळ मान्य करावी, अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली आहे.
प्रथेनुसार महापौरच समन्वय समितीची बैठक घेतात, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आता मुख्यमंत्र्यांनी समन्वय बैठक घेऊन जयंतीच्या नियोजनापासून शिवसेनेला खड्यासारखे बाजूला केले आहे. त्यावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

चैत्यभूमीवर अभिवादन
महाड येथील चवदार तळ्याच्या आंदोलनाला सोमवारी 90 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त महापौर महाडेश्‍वर यांच्यासह सभागृह नेते यशवंत जाधव आणि स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले.

Web Title: shivsena away from chaityabhumi programe