भूखंड घोटाळ्यांमुळे शिवसेना बॅकफूटवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

मुंबई - नागरिकांना विविध सोयी मिळाव्यात म्हणून आरक्षित असलेले भूखंड शिवसेनेने बांधकाम व्यावसायिकांना दिल्याचे आरोप वाढू लागले आहेत. त्याची ‘राजकीय’ दखल घेत भाजपने बुधवारी प्रथमच सर्व विरोधकांची मोट बांधून शिवसेनेला माघार घ्यायला लावली. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे वर्चस्व वाढू नये म्हणून भाजपने त्यांना अडचणीत आणण्याची खेळी खेळल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये रंगली आहे. अनेक कोट्यवधींचे भूखंड उद्याने, खेळाची मैदाने, शाळा आणि रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आले होते.

मुंबई - नागरिकांना विविध सोयी मिळाव्यात म्हणून आरक्षित असलेले भूखंड शिवसेनेने बांधकाम व्यावसायिकांना दिल्याचे आरोप वाढू लागले आहेत. त्याची ‘राजकीय’ दखल घेत भाजपने बुधवारी प्रथमच सर्व विरोधकांची मोट बांधून शिवसेनेला माघार घ्यायला लावली. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे वर्चस्व वाढू नये म्हणून भाजपने त्यांना अडचणीत आणण्याची खेळी खेळल्याची चर्चा राजकीय निरीक्षकांमध्ये रंगली आहे. अनेक कोट्यवधींचे भूखंड उद्याने, खेळाची मैदाने, शाळा आणि रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्यांचे आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव आणणे म्हणजे मुंबईकरांचा हक्क हिरावून घेण्यासारखेच आहे, अशी टीका होऊ लागली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये महापालिकेत भूखंडांचे कोट्यवधींचे घोटाळे उजेडात आले आहेत. आरक्षित असलेल्या भूखंडांवर पाणी सोडून बिल्डरांचे उखळ पांढरे केल्याचे आरोप शिवसेनेवर होऊ लागले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला अडचणीत आणण्याची नामी संधी भाजपला मिळाल्याचे राजकीय निरीक्षक दाखवून देत आहेत. भूखंड घोटाळ्याप्रकरणी भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी शिवसेनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. साहजिकच शिवसेना बॅकफूटवर गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असून त्यांच्या अडचणी वाढू लागल्याचे मानले जात आहे.

दहिसर, जोगेश्‍वरी, कुर्ला, लोअर परळ, गोरेगाव आणि पोयसरमधील कोट्यवधी रुपयांचे भूखंड उद्याने, खेळाची मैदाने, शाळा, रुग्णालये, रस्ते रुंदीकरण, बेघरांसाठी आरक्षण आदींसाठी राखीव ठेवण्यात आले होते. त्या भूखंडांची किंमत प्रत्येकी चारशे कोटी ते चार हजार कोटी रुपये इतकी आहे.

शिवसेना संबंधित भूखंड बिल्डरांच्या घशात घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला असून त्यांच्या संरक्षणासाठी भाजपच्या पुढाकाराने सर्व विरोधी पक्षाचे गटनेते एकवटले आहेत. मुंबईकरांसाठी या भूखंडांची गरज असून ते तातडीने ताब्यात घेण्याची मागणी विरोधी पक्षांनी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही धाव घेतली आहे.घोटाळ्याचा विषय सरकारकडे गेल्यामुळे त्याचा राजकीय लाभ उठवत निवडणुकीत तोच मुद्दा रेटण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, असे बोलले जात आहे.

भाजपच्या पुढाकाराने विरोधक आक्रमक
गोरेगाव आणि पोयसरमधील सहा भूखंडांवरून बुधवारी (ता. २) स्थायी समितीत विरोधकांनी वादळ उठविले. त्यामुळे प्रस्ताव सविस्तर माहितीसह समितीत सादर करावा, असा बचावात्मक पवित्रा शिवसेनेने घेतला होता. मात्र, भाजपच्या पुढाकाराने विरोधक आक्रमक झाल्याने शिवसेनेला माघार घ्यावी लागल्याची चर्चा आहे.

Web Title: Shivsena Backfoot by Land Scam