मुंबईत युतीची चर्चा विफल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

सर्वाधिकार मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्याकडे

सर्वाधिकार मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्याकडे
मुंबई - शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेची शनिवारची तिसरी फेरीही निष्फळ ठरली. भाजपने 114 जागा मागितल्यावर शिवसेनेने 60 जागा सोडण्याची तयारी दर्शवली. त्यावर तुमची ताकद आता कमी झाली असल्यामुळे आणखी जागा सोडा, असा सूचक इशारा भाजपने दिल्यावर जास्तीत जास्त 75 जागा देण्याची तयारी शिवसेनेने दाखवली. भाजपने हा प्रस्ताव फेटाळला. आता पुन्हा बैठक न घेता वरिष्ठ नेतेच निर्णय घेणार आहेत.

युती करण्याच्या चर्चेसाठी शनिवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांना फोन केला. त्यानंतर सायंकाळी वांद्रे येथे "रंगशारदा'मध्ये बैठक झाली. या वेळी शिवसेनेने सुरुवातीला 60 जागांचा प्रस्ताव ठेवला. तो भाजपने अमान्य केल्यावर जास्तीत जास्त 75 जागा सोडण्याची तयारी शिवसेनेने दाखवली. आता चौथी बैठक होणार नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत.

जास्तीत जास्त 95 जागा सोडणार
युती करण्याच्या निर्णयाचा शनिवारी शेवटचा दिवस होता. दोन बैठकांनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप होऊ लागल्याने मुंबईबरोबरच राज्यभरातील महापालिकेच्या चर्चेवर परिणाम झाला. तिसऱ्या बैठकीत जास्तीत जास्त 75 जागा सोडण्याची तयारी शिवसेनेने दाखवली असली तरी युती करायची झाल्यास शिवसेनेकडून 90 ते 95 जागा सोडल्या जाण्याची शक्‍यता आहे, असे समजते.

आम्ही 114 जागांचा प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवला होता. शिवसेनेने 60 जागा सोडण्याची तयारी दाखवली. त्यामुळे यापुढे चर्चा न करणे योग्य होईल, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांना वाटते. यापुढील चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल.
- ऍड. आशीष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष.

आम्ही भाजपला 60 जागाच सोडू शकतो. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेची ताकद वाढली आहे. पण जागा वाटपावर आता चर्चा करणे शक्‍य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख याबाबत निर्णय घेतील. त्यांच्या निर्णयानंतर गरज पडल्यास आम्ही पुन्हा चर्चा करू.
- अनिल देसाई, शिवसेना खासदार.

घटक पक्ष भाजपसोबत
शिवसेना-भाजप युतीची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे यांनी शेलार यांची भेट घेतली. मित्रपक्षांना महापालिका निवडणूक लढवायची आहे. त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवू. घटक पक्षांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले.

Web Title: shivsena-bjp alliance disturbance