शिवसेना-भाजपमध्ये श्रेयाची लढाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात वरळीत शिवसेना-भाजपमध्ये श्रेयाची लढाई दिसून आली. दोन्ही पक्षांनी आपापल्या नेत्यांचे आभार मानत या प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. बीडीडी चाळीतील रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. त्यामुळे भूमिपूजन समारंभात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी रात्रीच विरोधकांना ताब्यात घेतले.

जांबोरी मैदानात भूमिपूजन कार्यक्रम झाला. परिसरात शिवसेना-भाजपचे झेंडे फडकत होते. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीतून गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

शिवसेनेनेही गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचे आभार मानले. एकत्रित सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांमध्ये प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाजपच्या वतीने ढोल-ताशांचा गजर सुरू होता. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते घोषणाबाजीतून एकमेकांना प्रत्युत्तर देत होते. चोख बंदोबस्तामुळे परिसराला पोलिस छावणीचे रूप आले होते. सभामंडपात जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात होती.

सहकार्य करणारेच ताब्यात
म्हाडाने विश्‍वासात घेतले नसल्याचा आरोप करत रहिवाशांनी पुनर्विकासाला विरोध केला आहे. भूमिपूजन कार्यक्रम उधळण्याचा इशारा रहिवासी व संघटनांनी दिला होता. त्यामुळे वरळी, नायगाव येथून विरोधकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रकल्पाला सहकार्य करणारे ना. म. जोशी मार्गावरील कृष्णकांत नलगे यांच्यासह अनेकांना ताब्यात घेण्यात आले. यामुळे या परिसरातील रहिवाशांनी भूमिपूजन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. रहिवाशांसोबत म्हाडाने करार केल्याशिवाय घराचा ताबा सोडणार नाही, असा इशारा नलगे यांनी दिला आहे.

Web Title: shivsena-bjp disturbance