ठाण्यातही महाशिवआघाडी

ठाण्यातही महाशिवआघाडी

ठाणे ः विधानसभेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाशिवआघाडी आकार घेत असताना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही याचे पडसाद दिसून येत आहेत. ठाणे महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांची भेट घेत ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केल्याने शिवसेनेचा महापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला. महापौर पदासाठी शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी; तर कोणीही इच्छुक नसलेल्या उपमहापौर पदासाठी शिवसेना नगरसेविका पल्लवी कदम यांनी आपला एकमेव उमेदवारी अर्ज शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दाखल केला. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधी पक्षांकडून आणि भाजपकडूनदेखील कुणीही अर्ज दाखल न केल्याने ठाण्यात महाशिवआघाडीचे जमल्याची चर्चा रंगली आहे.

ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी खुल्या वर्गाचे आरक्षण पडल्यानंतर अनेक जण महापौर पदासाठी उत्सुक होते. यामध्ये सुरुवातीपासूनच सभागृह नेते नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर होते. राष्ट्रावादीमधून शिवसेनेत दाखल होऊन नगरसेवक बनलेल्या देवराम भोईर यांच्या कुटुंबियांनाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर पदाची कमिटमेंट दिली होती. केवळ देवराम भोईरच नव्हे, तर विद्यमान महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासमवेत नंदिनी विचारे, जयश्री फाटक तसेच परीक्षा सरनाईक यादेखील या पदासाठी उत्सुक होत्या; मात्र सुरुवातीपासूनच नरेश म्हस्के यांचेच नाव सर्वांत आघाडीवर चर्चेत होते. तेव्हा शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी केवळ नरेश म्हस्के यांनीच अर्ज दाखल केला. तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक उमेश पाटील तसेच सुधीर कोकाटे यांच्या नावाची चर्चा होती; मात्र या दोघांनीही नकार दिल्यानेे पल्लवी कदम यांचे नाव पुढे आले.

भोईर कुटुंबीय नाराज
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांना महापौरपदाचे आश्‍वासन देण्यात आले होते ; मात्र एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना अर्ज दाखल करण्यास सांगितल्याने भोईर कुटुंबीय नाराज असल्याचे समजते. अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या संजय भोईर यांनी या वेळी मुख्यालयातून काढता पाय घेतला. तेव्हा भोईर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com