शिवसेना-कॉंग्रेसमध्ये गृहकलह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मुंबई - लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपने मुंबईत पक्षबांधणीस सुरुवात केलेली असताना, शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये मात्र गृहकलह सुरू झाला आहे. शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्याकडून पक्षाच्या विभागप्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला आहे, तर कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी खासदार गुरुदास कामत यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. हा वाद थेट दिल्लीपर्यंत गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

ईशान्य मुंबईतील विभाग क्रमांक सातचे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागून घेतल्याचे समजते. यात पक्षातील अंतर्गत राजकारणच कारणीभूत ठरले आहे. त्यानंतर मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी आणि शाखाप्रमुख दीपक सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या तिघांत अंतर्गत वाद होते. त्यामुळेच दळवी यांचा राजीनामा घेण्यात आला; तर शेट्टी आणि सावंत यांची हकालपट्टी झाली. लोकसभेत किमान ईशान्य मुंबईत शिवसेना भाजपला फारशी त्रासदायक ठरू शकत नाही; मात्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपमध्येच लढत होणार, हे निश्‍चित. राजीनामे आणि पक्षातून काढल्यामुळे हा वाद मिटणारा नाही, तर त्याचे परिणाम निवडणुकीच्या प्रचारातही दिसू शकतात.

लोकसभेसाठी भाजपला मुंबईत कॉंग्रेस आव्हान देऊ शकते. भाजपने निवडणुकीची अंतर्गत तयारी सुरू केली आहे; मात्र अशातच कॉंग्रेसमधील वेगवेगळ्या गटांनी पुन्हा डोके वर काढले आहे. निरुपम यांनी मुंबईतील सहा जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी श्रेष्ठींकडे केली आहे. यापैकी चार जिल्हाध्यक्ष कामत गटाचे आहेत. त्यांना हटवून स्वत:च्या गटातील कार्यकर्त्यांच्या निवडीचा प्रयत्न निरुपम यांचा आहे. तशा नावांचे पत्र त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला पाठवल्याचे समजते.

निरुपम यांच्याविरोधात लॉबिंग
सध्या मुंबई कॉंग्रेसमध्ये निरुपम विरुद्ध इतर, असा वाद सुरू आहे. निरुपम यांना हटवण्यासाठी माजी खासदार मिलिंद देवरा, प्रिया दत्त यांच्यासह कामत आणि मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन त्यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Shivsena Congress Dispute Politics