नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकांचा वाद मिटला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी; नगरसेवकांची समजूत
नवी मुंबई - स्थायी समिती सभापती शिवराम पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत वाद अखेर "मातोश्री'वर गेल्यानंतर मिटला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून या दोन्ही नेत्यांना समजावले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी; नगरसेवकांची समजूत
नवी मुंबई - स्थायी समिती सभापती शिवराम पाटील आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेला अंतर्गत वाद अखेर "मातोश्री'वर गेल्यानंतर मिटला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून या दोन्ही नेत्यांना समजावले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

स्थायी समिती सभापती पाटील यांनी अर्थसंकल्पीय भाषणात विरोधी पक्षनेते चौगुले यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने त्यांच्यातील वाद उफाळून आला होता. नाराज झालेल्या चौगुले समर्थकांनी थेट राजीनामा देण्याची धमकी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडे दिल्याने विकोपाला गेलेला वाद मिटवण्यासाठी अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली.

वाट मिटवण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि उपनेते विजय नाहटा यांच्यामार्फत "मातोश्री' गाठली. चौगुले आणि पाटील यांच्यासह शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक "मातोश्री'वर गेले होते. उद्धव यांनी पाटील आणि चौगुले यांच्याशी तासभर चर्चा केली. यावेळी शिवराम पाटील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर स्तुतिसुमने उधळतात, अशी तक्रार चौगुले गटाच्या नगरसेवकांनी केली; तर चौगुले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची पाठराखण करीत असल्याची तक्रार पाटील यांच्या गटाने केली. त्यावर उद्धव यांनी सामंजस्याने वाद मिटवण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पालिका आयुक्त मुंढे यांना हटवण्याच्या मुद्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये आधीपासून दुफळी होती. स्थायी समिती सभापती पाटील विश्‍वासात घेत नसल्याची ओरड शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत पाटील आणि जगदीश गवते वारंवार तक्रार करीत होते. पाटील यांची काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांशी वाढलेली जवळीक आणि अर्थसंकल्पीय भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांवर उधळलेली स्तुतिसुमने यामुळे हा वाद आणखी वाढला होता. त्यामुळे चौगुले गटाच्या नगरसेवकांनी राजीनाम्याची धमकी दिली होती.

दोघांमध्ये किरकोळ बाबींवरून गैरसमज झाला होता. चर्चा केल्यानंतर तो दूर झाला आहे. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आता वाद राहिले नाहीत.
- विजय नाहटा, उपनेते, शिवसेना.

Web Title: shivsena corporator dispute solve