संभाव्य फूट टाळण्यासाठी शिवसेना नगरसेवक दुबईला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नेत्यांची शक्कल; विधानसभेसाठी युतीबाबत कायकर्ते साशंक 

मुंबई : राज्यात एकीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असताना मिरा-भाईंदरमध्ये मात्र संभाव्य फुटीमुळे शिवसेनेचे नेते सावध झाले आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक २८ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत पर्यटनासाठी दुबईला गेले आहेत. 

महापालिकेत भाजपची सत्ता असून, लोकसभा निवडणुकीतील युतीनंतर काही समित्या आणि प्रभाग अध्यक्षपदी शिवसेना नगरसेवकांची वर्णी लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत युती होईल की नाही, याबाबत शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये अद्याप साशंकता आहे. त्यामुळे शिवसेना नेते पुन्हा सावध झाले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत मिरा-भाईंदर मतदारसंघातून भाजपचे नरेंद्र मेहता विजयी झाले होते. शेजारच्या ओवळा-माजिवडा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांनी अटीतटीच्या लढतीत भाजपचे संजय पांडे या नवख्या उमेदवारावर मात केली होती. यापूर्वी आमदार मेहता यांनी शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला होता. सध्या जोरदार पाऊस पडत असताना लोकप्रतिनिधी नागरिकांना वाऱ्यावर सोडून दुबई पर्यटनाला गेल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. 

मिरा-भाईंदरमधील भाजप नगरसेवक यापूर्वी उटी, कुर्ग आणि महाबळेश्‍वरलाही गेले होते. महापालिकेच्या तिजोरीत जमा होणाऱ्या करदात्या नागरिकांच्या पैशांमधून नगरसेवकांनी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली काश्‍मीर, सिमला, कुलू-मनाली, डेहराडून, दार्जिलिंग, सिक्किम, गोवा, म्हैसूर, अंदमान-निकोबार आदी ठिकाणांचे पर्यटन केले आहे. करदात्यांच्या पैशातून होणारे हे दौरे आयोजित करण्यासाठी अनेक नगरसेवक उत्सुक असतात. नगरसेवकांच्या अशा दौऱ्यांवर आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च झाला आहे. 

आता शिवसेनेचे नगरसेवक २८ जुलै ते २ ऑगस्ट अशा पाच दिवसांच्या दौऱ्यासाठी दुबईला गेले आहेत. या दौऱ्याचा खर्च ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. माजी महापौर कॅटलीन परेरा, नगरसेवक धनेश परशुराम पाटील, स्नेहा पांडे, अनंत शिर्के यांना वगळून बाकी सर्व १७ नगरसेवक दुबई पर्यटनाला गेले आहेत. दरम्यान, दौऱ्यावर गेलेल्या नगरसेवकांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. स्थानिक शिवसेनेतील संभाव्य फूट टाळण्यासाठीच हा दौरा काढण्यात आल्याचे मात्र बोलले जात आहे. 

मागील वर्षी दौरा रद्द 
अभ्यासाच्या नावाखाली अनेक दौरे झाले; मात्र त्याबाबत महापालिकेत चर्चा झाली नाही अथवा फायदा झाल्याचे दिसत नाही, अशी टीका होत आहे. यापूर्वी अशा दौऱ्यांचा खर्च महापालिकाच करत असे. गेल्या वर्षी नगरसेवकांचा दौरा महापालिकेच्या पैशाने कुर्ग या पर्यटनस्थळी काढण्याचे ठरले. त्यावेळी नागरिकांनी विरोध केला आणि टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुले हा दौरा रद्द करण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena councilors going for dubai tour