सोमय्या पायचाटू; शिवसेनेचे प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

वेळ पडल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत घेणार की नाही हे जाहीर करा, असे आवाहनही परब यांनी दिले. खासदार किरीट सोमय्या हे "मातोश्री'चे पाय चाटत मोठे झाले. मातोश्रीवरून कोणीतरी त्यांच्या प्रचाराला यावे म्हणून ते विनवण्या करायचे. मिनाताई ठाकरे यांना ते प्रचाराला घेऊन जात असत, असा गौप्यस्फोटही परब यांनी केला.

मुंबई - महापालिका निवडणुकीच्या मैदानात शिवसेना - भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. फिक्‍सिंग आणि बिल्डरच्या अंडरस्टॅंडिंगच्या आरोपांवरून शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे लोक सट्टाबाजाराशी संबंधित असल्यानेच त्यांना फ्रेण्डली मॅच, फिक्‍सिंग हे शब्द माहीत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेने प्रत्युत्तर दिले. फिक्‍सिंगचे आरोप करणाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करणार की नाही हे जाहीर करा, असे आवाहनही शिवसेनेने केले.

शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये भाजपविरोधात फिक्‍सिंग झाले आहे, असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केला होता. त्याचा समाचार घेताना शिवसेनेचे आमदार अनिल परब काल (सामेवारी) पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुंबई अध्यक्ष शेलार हे दोघेही क्रिकेटशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना फ्रेण्डली मॅच, फिस्किंग असे शब्द माहित आहेत. हे सट्टाबाजारातील लोकच असे आरोप करून मतदारांची दिशाभूल करत आहेत. शेलार यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी खुल्या व्यासपीठावर येऊन फिक्‍सिंगबाबत बोलावे, त्यांना योग्य उत्तर दिले जाईल, असेही परब म्हणाले.

वेळ पडल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसची मदत घेणार की नाही हे जाहीर करा, असे आवाहनही परब यांनी दिले. खासदार किरीट सोमय्या हे "मातोश्री'चे पाय चाटत मोठे झाले. मातोश्रीवरून कोणीतरी त्यांच्या प्रचाराला यावे म्हणून ते विनवण्या करायचे. मिनाताई ठाकरे यांना ते प्रचाराला घेऊन जात असत, असा गौप्यस्फोटही परब यांनी केला.

शेवाळेंकडून सोमय्यांचा समाचार
खासदार राहुल शेवाळे यांनी सोमय्यांच्या आरोपांचा समाचार घेतला. मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद केल्यावर तो भूखंड कोणालाही देण्यात येणार नाही. तेथे उद्यान बनवण्यात येईल. मात्र सोमय्या यांनी एका बिल्डरकडून पैसे घेतले असून त्याला ही जागा देण्याचा डाव असल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या ठेकेदारला पैसे मिळावेत यासाठी आशीष शेलार यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. पूर्वी सोमय्या आरोप करून पैसे घ्यायचे, आता मते मिळवण्याचा प्रयत्न करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपला जर खऱ्या अर्थाने कचऱ्याची समस्या सोडवायची असेल तर त्यांनी ऐरोली आणि तळोजा येथील भूखंड तत्काळ हस्तांतरीत करावा. कचराडेपोच्या या दोन्ही जागा राज्य सरकारमुळे हस्तांतरीत झालेल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: shivsena criticize bjp leader kirit somaiyya