मराठी टक्‍क्‍यासाठी शिवसेनेची बांधणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन राहत्या जागीच; नव्या धोरणासाठी हालचाल
- विष्णू सोनवणे

प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन राहत्या जागीच; नव्या धोरणासाठी हालचाल
- विष्णू सोनवणे
मुंबई - महापालिका निवडणुकीत मराठी टक्‍क्‍याने शिवसेनेला तारले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मुंबईतील मराठी टक्का बळकट करण्यासाठी महापौरपदाच्या निवडीनंतर शिवसेना हालचाल सुरू करणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन राहत्या जागीच करण्याचे नवे धोरण तयार करण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेने "एकला चलो रे'ची भूमिका घेतली असून, यापुढे भाजपसोबत युती न करण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्याचे बोलले जात आहे. पालिका निवडणुकीत निसटते बहुमत मिळाल्याने शिवसेनेला ताकही फुंकून प्यावे लागत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना सजग झाली आहे. काही वर्षांत मराठी टक्का मुंबईबाहेर गेला. त्याचा फटका शिवसेनेलाच बसला. मुंबईत 1982 मध्ये गिरणी कामगारांचा संप झाला होता. त्यात अडीच लाख गिरणी कामगार उद्‌ध्वस्त झालेत. तेथून मराठी टक्का घसरण्यास सुरुवात झाली. 1990-95 च्या सुमारास गिरणगावातील सुमारे साडेतीन हजार कुटुंबे चारकोप, गोराई येथे स्थलांतरित झाली. शहरातील घरे विकून त्यांनी कमी स्वस्त घरे खरेदी केली. घरांच्या आणि जागांच्या किमती वाढल्या तशा मराठी माणूस मुंबईबाहेर कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई, विरारपर्यंत फेकला गेला. मराठी माणसांचे स्थलांतर आता राजकीय भवितव्यासाठी शिवसेनेला अडचणीचे वाटू लागले आहे. पालिकेच्या निकालानंतर ही जाणीव शिवसेनेला प्रकर्षाने होत आहे. त्यामुळे आहे त्या टक्‍क्‍याला वाचवण्यासाठी आता प्रयत्न होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर होऊ नये यासाठी गिरगावातील मेट्रो प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आहे त्याच जागी करा, असा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला होता. यापुढे मुंबईतील विविध विकास प्रकल्प राबवले जाणार आहेत. "एसआरए'चे सुमारे 1400 प्रकल्प प्रलंबित आहेत. म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास, जुन्या चाळी आणि इमारतींचा पुनर्विकास अशा प्रकल्पांतून मराठी टक्का स्थलांतरित होऊ नये, यासाठी शिवसेना सतर्क झाली आहे.

जुन्या चाळी, इमारती आणि प्रकल्पग्रस्त होणाऱ्या मराठी कुटुंबांचे आता स्थलांतर होऊ दिले जाणार नाही. आहे त्याच जागी त्यांचे पुनर्वसन होण्याकरता शिवसेना प्रयत्न करेल. स्थलांतराचा फटका माझ्यासह शहरातील उमेदवारांना बसला. त्याबाबत धोरण ठरवले जाईल.
- स्नेहल आंबेकर, महापौर

मुंबईतील मराठी मतदार...
उत्तर मुंबई - 2,59,107
उत्तर पश्‍चिम मुंबई - 3,28,190
ईशान्य मुंबई - 3,85, 935
दक्षिण मुंबई - 7,19,850
उत्तर-मध्य मुंबई - 3,73,666
दक्षिण-मध्य मुंबई - 3,52,564

Web Title: shivsena filding for marathi voting percentage