शिवसेनेचे गुजराती कार्ड!

- विष्णू सोनवणे
मंगळवार, 17 जानेवारी 2017

शिवसेनेच्या इच्छुकांना पक्षात घेण्याबरोबरच विद्यमान नगरसेविकेला थेट मैदानात उतरवणार..

शिवसेनेच्या इच्छुकांना पक्षात घेण्याबरोबरच विद्यमान नगरसेविकेला थेट मैदानात उतरवणार..

मुंबई - भाजपला रोखण्यासाठी ‘गुजराती कार्ड’चा वापर करून भाजपविरोधात नवा राजकीय डाव खेळण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे. उमेदवारी देताना गुजराती समाजाला प्राधान्य देऊन भाजपला रोखण्याचे नवे डावपेच सुरू आहेत. त्या दृष्टीने शिवसेनेची चाचपणी सुरू असून गुजराती समाजातील तुल्यबळ उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. त्यामुळे भाजपचा मुंबईतील आधार मानल्या जाणाऱ्या गुजराती मतांच्या परिसरांत भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशा तीन भागांत विभागणी होण्याची दाट शक्‍यता आहे.

मुंबईतील गुजराती समाजाने भाजपची नेहमीच पाठराखण केली. गुजराती आणि मराठी यांच्यात शिवसेनेने कधी दुरावा केला नाही किंवा गुजराती समाजाला कधी चुचकारलेही नाही. उलट दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गुजराती समाजाला लक्ष्मीपुत्र; तर आम्ही सरस्वतीपुत्र असा उल्लेख करून जवळ केले. डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मध्ये झालेल्या जातीय दंगलीतही शिवसेनेने गुजराती समाजाला आधार दिला. त्यांच्या जीवित आणि मालमत्तांचे रक्षण केले. ही जाणीव आजही गुजराती समाजाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही गुजराती समाजाला कधी दुखावले नाही. त्यामुळे या निवडणुकीत हाच मुद्दा घेऊन त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेनेने सुरू केला आहे. 

सत्तेचा वाटा मिळावा, यासाठी शिवसेनेविषयी गुजराती समाजाला आकर्षण वाटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून हेमराज शहा यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या गुजराती समाजाच्या व्यापारी असोसिएशननेही शिवसेनेला आता ताकद दिली आहे. धीरेन लिंबचया, अशोक पटेल यांचे शिवसेनेचे चांगले व्यापारी संघटन आहे. राजूल पटेल यांना शिवसेनेने २००७ मधील पालिकेच्या निवडणुकीत निवडून आणले होते. मुंबईत गुजराती मतदारांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघातून तुल्यबळ उमेदवारांचा शोध सुरू असून शिवसेनेने भाजपला टक्कर देण्याची तयारी केल्याचे समजते. 
 

गुजराती समाजाची ‘व्होट बॅंक’
घाटकोपर, बोरिवली, दहिसर, मालाड, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझ, काळबादेवी, मलबार हिल, मुलुंड (गुजराती मते १७ टक्के)

प्रचारासाठी स्वतंत्र टीम 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाने गुजराती व्यापारीवर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. या निर्णयाच्या परिणामांच्या मुद्द्यावर गुजराती समाजात प्रचार करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: shivsena gujrati card