शिवसेनेचे एकला चलो!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2016

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी
मुंबई - नगरपालिकांमध्ये शिवसेना-भाजपची युती झाली असली, तरी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवक, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले असल्याचे समजते. प्रत्येक प्रभागातील इच्छुकांचा बायोडेटा शिवसेनेच्या शाखांमध्ये जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यातील २१२ नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपने आयत्या वेळी युती केली. ती जाहीर करताना मुंबई, ठाण्यासह इतर १० महापालिकांच्या आगामी निवडणुकांच्या युतीबाबतही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

नगरपालिका निवडणुकीसाठीच्या युतीनंतर मुंबई, ठाण्यासह इतर शहरांमधील कार्यकर्ते संभ्रमात होते. आता उद्धव ठाकरे यांनी मुंबई, ठाण्यातील नगरसेवक, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेने लढण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेने प्रभाग स्तरावर उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. इच्छुकांची माहिती शिवसेनेच्या शाखेमध्ये संकलित करण्यात येत आहे, अशी माहिती शिवसेनेच्या एका नगरसेवकाने दिली.

भाजपचा धसका?
विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-भाजपची युतीची चर्चा होती; मात्र आयत्या वेळी दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. तसाच प्रकार कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वेळी झाला होता; मात्र त्या वेळी दोन्ही पक्ष सावध होते. मुंबईत भाजप २२७ पैकी निम्म्या जागा मागण्याची शक्‍यता आहे; मात्र शिवसेनेकडून जास्तीत जास्त ९० जागा देण्याची तयारी आहे. आयत्या वेळी युतीची बोलणी फिसकटल्यास स्वतंत्र लढायचे झाल्यास सर्व प्रभागांमध्ये उमेदवार तयार ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले असल्याचे समजते.

Web Title: shivsena independent in mumbai municipal election