संजय राऊतांनंतर 'हा' शिवसेना नेता संतापला, कंगनावर या शब्दात केली टीका

पूजा विचारे
Sunday, 6 September 2020

शिवसेनेनं राज्यभरात तिच्याविरोधात आंदोलन देखील केलं आहे. शिवसेना नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनीही आता कंगना राणावतवर टीका केली आहे. 

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सध्या अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली आहे. कंगनानं  मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त भागाशी केल्यानं हा वाद चांगलाच पेटला आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर सर्वत्र तिच्यावर टीका केली जात आहे. शिवसेनेनं राज्यभरात तिच्याविरोधात आंदोलन देखील केलं आहे. शिवसेना नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनीही आता कंगना राणावतवर टीका केली आहे. 

आदेश बांदेकर यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये लिहिलं की, खोट्या घोड्यावर बसत , दुसऱ्यानी पढवलेले स्क्रिप्ट वाचल्याने कधी कोणी झाशीची राणी होत नाही.. त्यासाठी कर्मभूमीवर खरी निष्ठा आणि श्रद्धा असावी लागते जी झाशीच्या राणीनी अखेरपर्यंत जोपासली...कुणालाही राणी ची उपमा देऊन झाशीच्या राणीचा अपमान करण्यात काही राम नाही.

कंगनानं मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केली. त्यानंतर तिच्या वक्तव्यावर वाद उफाळला आहे. 

तरच मी माफी मागेनः संजय राऊत 

कंगनाला संजय राऊत यांनी हरामखोर मुलगी असं म्हटलं होतं. त्यानंतर या शब्दावरुन अनेकांनी आक्षेपही घेतला.   राऊत यांनी अभिनेत्री माफी मागावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. मात्र जर कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर मी तिची माफी मागण्याबद्दल विचार करेन, असं राऊत म्हणालेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

तसंच मुंबईबद्दल वक्तव्य करण्याची हिंमत केली तशीच हिंमत कंगनानं अहमदाबद्दल करावी, असा टोलाही राऊत यांनी कंगनाला लगावला आहे. कंगनाने तिच्या एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. तिच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी तिच्यावर टीका केली.

ShivSena Leader Adesh Bandekar Attack On Actress Kangana Ranout


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena Leader Adesh Bandekar Attack On Actress Kangana Ranout