Vidhan Sabha 2019 : ही प्रचंड गर्दी म्हणजे विजयासाठी जनआशीर्वाद : प्रदीप शर्मा

Pradip Sharma
Pradip Sharma

मुंबई : ज्यांच्यासाठी मी या लढाईत उतरलो आहे, ती विरार, नालासोपाराची जनताच आज माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येथे जमली आहे. आदिशक्ती जीवदानी देवीचे मी कालच आशीर्वाद घेतले आहेत. आता या जनसागरानेही मला विजयासाठी जनआशीर्वाद दिला आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी गुरुवारी नालासोपारा येथे केले.

प्रदीप शर्मा यांनी 132 नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक माझी एकट्याची नसून असुविधांनी त्रस्त झालेल्या प्रत्येकाची आहे. ज्याला बदल हवा आहे तो प्रत्येकजण माझ्या या लढाईत सहभागी झाला आहे. त्या प्रत्येकाने मला पाठबळ द्यावे, असे आवाहन शर्मा यांनी केले. भाजप महासचिव राजन नाईक हे शर्मा यांना पाठबळ द्यायला खास उपस्थित होते.

नालासोपारा मतदारसंघातील बदलाची हवा शर्मा यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या प्रचंड जनसमुदायातून उमटणाऱ्या प्रतिसादातून जाणवत होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सेंट्रल पार्क येथून निघालेल्या शर्मा यांच्या सोबत चालणारी गर्दी नंतर वाढतच गेली. वृंदावन गार्डन येथील निवडणूक कार्यालयात पोहोचेपर्यंत शर्मा यांच्या रॅलीला जनसागराचे स्वरुप प्राप्त झाले होते. शर्मा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित या रॅलीच्या निमित्ताने शिवसेना  आणि भाजपाने  मित्रपक्षांना सोबत घेत मोठे शक्तीप्रदर्शन करत ही लढत जिंकण्याचीच ईर्षा प्रगट केली. रॅलीचा संपूर्ण मार्ग भगव्या, निळ्या झेंड्यांनी भरून गेला होता. बहुजन विकास आघाडीच्या पिवळ्या रंगावर शिवसेनेच्या भगव्या झेंड्यांनी मात केल्याचे चित्र दिसत होते. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला.., जय भवानी जय शिवाजी, शर्मासाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शिवसेना भाजप महायुती जिथे, विकासाची पहाट तिथे.. अशा जोरदार घोषणांनी शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वातावरण दणाणून टाकले होते.

माझ्याबद्दल बरळणाऱ्या लोकांच्या टीकेकडे मी लक्ष देणार नाही. विकासकामांच्या थापा मारण्यापलिकडे त्यांच्याकडे दुसरे काहीही नाही. गेल्या वेळचा त्यांचा जाहिरनामा वाचला तरी बहुजन विकास आघाडीने लोकांच्या तोंडाला कशी पाने पुसली आहेत ते लक्षात येईल. त्याचा पर्दाफाश मी करणार आहेच. म्हणूनच या मतदारसंघात विकास, सुविधांची नवी पहाट आणण्याच्या प्रामाणिक इच्छेने मी येथे उभा आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला. ही जबाबदारी सोपवल्याबद्दल त्यांनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांविषयी कृतज्ञ भाव व्यक्त केला. शर्मा यांच्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले, पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण,  जिल्हा उपाध्यक्ष नवीन दुबे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुभाष साटम, महासचिव राजन नाईक,  जे. P. सिंह शिवसेना माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष चव्हाण, नेहा दुबे यांचेही त्यांनी आभार मानले. शाखाप्रमुख, महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शर्मा यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

रिटर्न तिकीट नाही पासच काढलाय..
कुणीतरी बरळलं की रिटर्न तिकीट काढलंय.. मी सांगतो की मी तर पासच काढलाय. कारण मला या भागात सुविधा आणायच्या आहेत, ठाणे-मुंबईसारखं नवं, सुंदर विरार, नालासोपारा घडवायचं आहे. त्यासाठी निवडून आल्यावर मला सरकारकडे पाठपुरावा करायचा आहे, मंत्रालयात जाऊन निधी आणायचा आहे. त्यासाठी पासच लागणार ना, अशी पृच्छा शर्मा यांनी करताच हास्याची एकच खसखस पिकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com