अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात शिवसेनेची महाड पालिकेवर धडक

सुनील पाटकर
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

महाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि दुजाभाव केल्याचा आरोप करत महाड शहर शिवसेनेने आज सकाळी पालिकेवर धडक मोर्चा नेला.

महाड : महाडमध्ये महाड नगरपालिकेने गेली तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबवून महाड स्वच्छ केले असले तरी या मोहिमेत अतिक्रमण दूर करताना मनमानी आणि दुजाभाव केल्याचा आरोप करत महाड शहर शिवसेनेने आज सकाळी पालिकेवर धडक मोर्चा नेला.

या मोर्चात महाडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह व्यापारी व नागरिक सहभागी झाले होते. शिवसेनेचे युवा नेते विकास गोगावले,शहरप्रमुख नितिन पावले,नगरसेवक सुनील अगरवाल व दीपक सावंत,बिपीन म्हामुनकर,नितिन आर्ते उपस्थित होते. महाडमध्ये महाड नगरपालिकेच्या जागा आणि गटारांवर असलेले अतिक्रमण दूर करण्यासाठी महाड नगरपालिकेने 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर या तीन दिवसात विशेष मोहीम हाती घेतली होती.

यामध्ये शहरातील छत्रपती शिवाजी मार्ग, महात्मा गांधी मार्ग, शिवाजी चौक ते मोहल्ला, दस्तुरी नाका ते काकरतळे, याठिकाणी असलेले अतिक्रमण दूर करण्यात आले. या कारवाईवर काही फिरते दुकानदार, व्यापारी, आणि विरोधी पक्षातील नगरसेवक नाराज झाले होते. ही कारवाई म्हणजे महाड नगरपालिकेची मनमानी असल्याचे सांगत महाड नगरपालिकेवर गुरुवारी सकाळी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला फारसा प्रतिसाद लाभला नसला तरी महाड पालिकेने केलेली कारवाई ही दुटप्पी भावनेतून केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

स्वच्छतेच्या नावाखाली महाड बाजारपेठेची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून कोणत्याच नगरसेवकाला विश्वासात घेऊन हि कारवाई केली नसल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक सुनील अग्रवाल यानी मोर्चात केला. तर महाड नगरपालिकेची ही मनमानी खपवून घेतली जाणार नाही. शिवाय व्यापाऱ्यांना पूर्व कल्पना न देताच ही कारवाई केली असल्याचा आरोप मयूर चांदोरकर, अमित फुटाणकर, नितीन पावले, यांनी केला. बिपीन म्हामुणकर यांनी देखील पालिकेच्या प्रशासकीय कामावर झोड उठवली.

महाड नगरपालिकेत काम करत असलेल्या मुख्याधिकारी यांनी केली मनमानी चुकीची असून रस्त्यावर लाईन आऊट न करताच कारवाई कशी केली, असा प्रश्न उपस्थित केला. ही कारवाई करत असताना काही अतिक्रमणे तोडली गेली नाहीत. यामुळे पालिकेने नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी देखील केली. मोर्चेकरांनी दिलेले निवेदन मुख्याधिकारी जीवन पाटील आणि बांधकाम अभियंता सुहास कांबळे यांनी स्वीकारले.

Web Title: Shivsena movement against encroachment removal campaign