कपिल पाटील यांना विरोध कायम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

शिवसैनिकांनी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमक पोस्ट टाकत आपला विरोध तीव्र केला आहे.

ठाणे - शिवसेनेचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या निवडणुकीत खच्चीकरण करणाऱ्या भाजपला आता लोकसभेच्या निवडणुकीत धडा शिकविण्याचा निर्णय कल्याण, शहापूरसह भिवंडीतील शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांनी घेतल्यामुळे भाजपच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. शिवसैनिकांनी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमक पोस्ट टाकत आपला विरोध तीव्र केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थीची भूमिका घेऊनसुद्धा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेत आहेत. 

भिवंडी शहर व ग्रामीण भागात शिवसेनेची मजबूत पकड असल्याने विद्यमान खासदार, भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी सूडबुद्धीने काम केल्यामुळे विकासकामांचा बोजवारा उडाला आहे. कल्याण व भिवंडी पालिका निवडणूक, शहापूर, मुरबाड येथील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना त्रास देण्याची भूमिका भाजपच्या वतीने खासदारांनी बजावली होती. त्यामुळे तो राग आता मतपेटीतून दाखविण्याचा अघोषित निर्णय शिवसेना पदाधिकाऱ्यांसह अन्य पक्षांच्या पुढाऱ्यांनी घेतला आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्ते एमएमआरडीएच्या माध्यमातून शिवसेना आमदाराच्या पुढाकाराने होत असताना या कामांमध्ये अडथळा निर्माण करून भाजपच्या वतीने ही कामे केल्याची दिशाभूल मतदारसंघामध्ये केली जात आहे. या कामांना चालना देण्याऐवजी खीळ घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध कामांचे श्रेय शिवसेना जिल्हा परिषद सदस्यांना जाऊ नये, यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी केला आहे. 

टोरंट पॉवरच्या माध्यमातून पिळवणूक 
शहर व ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीचा भिवंडीतील मुदतकरार संपुष्टात आला असतानासुद्धा त्याला पुन्हा मुदतवाढ देऊन भाजप सरकारने भिवंडीकरांची गळचेपी केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. सरकारची परवानगी नसताना वीज कंपनी मोठ्या प्रमाणात वीजबिल पाठवून ग्राहकांची पिळवणूक करत असल्याने गेल्या महिन्यात शहरातील यंत्रमाग व्यापारी व वीज ग्राहकांनी भाजपच्या मंत्र्यांकडे तसेच खासदार कपिल पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या; मात्र त्यांनी वीज कंपनीची बाजू घेऊन ग्रामस्थांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे या निवडणुकीत खासदारांना धडा शिकविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याचे शिवसैनिक सांगत आहेत. 

शिवसेना नेत्यांचीही दमछाक होणार 
कल्याण पश्‍चिम मतदारसंघातही शिवसेनेच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे काम खासदारांच्या इशाऱ्यावरून झाल्याची नाराजी व्यक्‍त होत आहे. भाजप उमेदवारांचे काम न करण्याची भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. ही नाराजी दूर करताना आता शिवसेना नेत्यांचीही दमछाक होताना दिसत आहे. 

Web Title: Shivsena oppose to Kapil Patil