शिवसैनिकांना मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

Shivsena
Shivsena

मुंबई - शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकांना मार्गदर्शनही करणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला पहिल्यांदाच इतर पक्षातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आले असून, त्यांचे मार्गदर्शनपर भाषणही होणार आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस उद्या सायंकाळी सहा वाजता षण्मुखानंद सभागृहात शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. "मातोश्री'वर झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेकडून अधिकृतरीत्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारत शिवसेना वर्धापन दिनाला येण्याचे मान्य केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेना युतीच्या रणनीतीचे मार्गदर्शन या वेळी होणार आहे. लोकसभेप्रमाणे महाराष्ट्र विधानसभाही शिवसेना आणि भाजपने एकदिलाने लढावी आणि मोठा विजय मिळवावा, यासाठी युतीचे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येत आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच वर्धापन दिनानिमित्ताने मार्गदर्शन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीबाबतची आपली भूमिका ते स्पष्ट करणार असल्याचे समजते.

उद्धव ठाकरे नुकतेच अयोध्येवरून आले आहेत. अयोध्येतून त्यांनी पुन्हा एकदा राममंदिराचा नारा बुलंद केला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना हिंदुत्वाचे कार्ड वापरणार का, हेही उद्या स्पष्ट होईल. शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला मिळालेल्या अवजड उद्योग खात्यावर उद्धव हे नाराज आहेत. यावर ते नेमके काय बोलणार, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

उद्धव यांच्याबरोबरच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले, औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हे उपास्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला शिवसेनेचे सर्व नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आदित्यबाबत बोलणार?
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा चंग शिवसेनेने बांधल्यामुळे आक्रमकपणे कामाला लागण्याचे आदेश उद्धव उद्याच्या मेळाव्यातून देतील, असा अंदाज आहे. शिवाय ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी असलेल्या योजनांची अंमलबजावणी यावरही उद्धव मार्गदर्शन करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com