चिक्की प्रकरण न्यायालयात; शिवसेनेची याचिका दाखल 

चिक्की प्रकरण न्यायालयात; शिवसेनेची याचिका दाखल 

नवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना न्याहरीत शिजवलेल्या अन्नाऐवजी चिक्की वाटप करण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्णयाविरोधात शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सादर केलेली जनहित याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. लवकरच त्यावर सुनावणी होणार आहे. 

महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना न्याहरीत शिजवलेले अन्नपदार्थ (डाळ, शिरा, पोहे, उपमा) देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. खारघर येथील इस्कॉन संस्थेमार्फत तो अन्नपुरवठा करण्यात येणार होता. प्रत्येक विद्यार्थ्याच्या न्याहरीसाठी संस्थेतर्फे 15 रुपयांचा दर आकारण्यात आला होता; परंतु राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या योजनेवर आक्षेप नोंदवून प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळला. त्यावेळी नाश्‍तासाठी शिजवलेल्या अन्नापेक्षा चिक्की कशी महत्त्वाची आणि पोषक आहे, याचे दाखले त्यांनी दिले. त्यानंतर प्रस्तावाला विरोध करीत चिक्की वाटप करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. 

त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी विरोधात आक्रमक पवित्रा घेत वाशीतील महापालिकेच्या शाळेसमोर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. या वेळी चिक्की हवी की शिजवलेले अन्न, यावर पालक आणि विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीसहित प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यात बहुतांश पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सकाळी शिजवलेले अन्न हवे असल्याचे मत नोंदवले. शिवसेनेने पालकांनी नोंदवलेली मते आणि स्वाक्षऱ्यांचा अहवालही न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत जोडला आहे. 

निवडणुकीत मुद्दा गाजणार 
येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चारी बाजूने घेरताना शिवसेनेने पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या मुखातून काढलेला अन्नाच्या मुद्द्याचा वापर होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हा मुद्दा कळीचा ठरल्याने त्याचा राष्ट्रवादीच्या मतांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com