
ShivSena Row: शिवसेनाप्रमुख कोण? शिवसेना भवन कोणाचं?; राऊतांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई : उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि नाव दोन्ही गमावल्यानंतर आता शिवसेनाप्रमुख कोण? शिवसेना भवन कोणाचं? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (ShivSena Row Sanjay Raut said clearly about Who is the Shiv Sena chief Whose Shiv Sena Bhavan)
पत्रकारांनी राऊतांना विचारलं, आता उद्धव ठाकरेंच्या पदाचं काय? त्याचं शिवसेनापक्ष प्रमुखपदाचं काय? यावर राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरेच आमचे शिवसेनाप्रमुख आहेत. तेच माझे सेनापती आहेत. तेच आमचे शिवसेनाप्रमुख आहेत. हे निवडणूक आयोग ठरवणार नाही, हे दुसरं कोणीही ठरवणार नाही. त्यांची नेमणूक बाळासाहेब ठाकरे हयात असताना झालेली आहे. आम्ही सगळ्यांनी यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. कोण शिंदे गट त्यांनी स्वतःचं पहावं. त्यांनी स्वतःला ब्रिगेडिअर, जनरल किंवा एअर व्हाईस मार्शल म्हणून जाहीर कराव"
शिवसेनाच्या शाखा, शिवसेना भवन इथं जे शिवसेनेचं नाव आहे ते तसंच राहणार का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, "निवडणूक आयोगानं शेण खाल्लं म्हणून आमच्या शाखा त्या दिशेनं जाणार नाहीत. शाखा आणि शिवसैनिक तिथेच बसतील आणि शिवसेनेची शाखा म्हणूनचं काम करतील. शिवसेना भवनाचं काहीही होणार नाही. पक्ष आमचाच आहे. शिवसेनाभवनासह शिवसेनेचा शाखा आणि हजारो शिवसैनिक आमच्याबरोबच राहणार आहेत.
40 आमदार आणि 10 खासदार म्हणजे शिवसेना नाही. जमिनीवर जी शिवसेना होती त्यांमुळं हे आमदार आणि खासदार झाले. याचा विचार निवडणूक आयोगानं केला नाही. त्यांनी फक्त किती आमदार-खासदार त्यांच्याबाजूने गेले त्याच्या आधारावरच त्यांनी निर्णय घेतला. या निर्णयाचं सत्ताधारी स्वागत करत आहेत. उद्धव ठाकरे म्हणतात तेच बरोबर आहे. खरी शिवसेना जनतेच्या मनात आहे. एक निर्णय विकत घेतला म्हणजे पक्ष तुमचा होत नाही. असे घुसखोर खूप असतात, बांगलादेशी या देशात घुसले म्हणजे हा देश त्यांचा होत नाही, अशा टोळ्या येतात आणि जातात. त्यांची दखल घेण्याची गरज नाही, अशा शब्दांत राऊत यांनी संताप व्यक्त केला.