महापालिकेच्या विशेष समित्यांवर शिवसेनेच्याच वर्चस्वाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

महापालिकेच्या विशेष समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी शिवसेनेने नावे जाहीर केली आहेत. पुरेसे संख्याबळ आणि भाजपने पाठिंबा दिल्यामुळे या उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याची आणि या समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहण्याचीच शक्‍यता आहे. 

मुंबई - महापालिकेच्या विशेष समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी शिवसेनेने नावे जाहीर केली आहेत. पुरेसे संख्याबळ आणि भाजपने पाठिंबा दिल्यामुळे या उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याची आणि या समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहण्याचीच शक्‍यता आहे. 

मुंबई महापालिकेच्या विशेष समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. मनसेतून शिवसेनेत आलेले प्रकाश पाटणकर यांच्या पत्नी नगरसेविका प्रीती पाटणकर यांचे नाव स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षपदासाठी जाहीर कण्यात आले. या पदासाठी रमाकांत रहाटे यांचे नाव चर्चेत होते; मात्र त्यांचा पत्ता कापण्यात आला. स्थापत्य उपनगरे समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेने उपेंद्र सावंत यांना उमेदवारी दिली आहे. आरोग्य समितीच्या अध्यक्षपदासाठी आदित्य ठाकरे यांच्या विश्‍वासातील अमेय घोले यांनी अर्ज भरला आहे. 

मनसेतून शिवसेनेत आलेल्या हर्षिला मोरे यांचे महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी नाव निश्‍चित केले आहे. बाजार व उद्यान समिती अध्यक्षपदी भांडुपचे नगरसेवक उमेश माने यांचे नाव निश्‍चित झाले आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची आस लागलेल्या शीतल म्हात्रे यांचेही पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांनी विधी व महसूल समितीच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. ही समिती देऊन त्यांची समजूत काढण्यात आल्याचे बोलले जाते. या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज महापालिका चिटणिसांकडे सादर केले. भाजपच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे या समित्यांवरील वर्चस्व कायम राहणार आहे. 

Web Title: Shivsena supremacy on the special committees of the municipal corporation