शिवसेनेची विधानसभा तयारी सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

नगरसेवकांना प्रशिक्षण, निकालाचाही अभ्यास
मुंबई - महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता शिवसेनेने विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. नगरसेवकांना प्रशिक्षण देण्याबरोबरच निवडणुकीत मिळालेल्या आणि गमावलेल्या मतांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबईच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेवकांचा अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहे.

विभागातील समस्या, पालिका सभागृहात मांडायचे विषय, पालिकेच्या कामकाजातील तांत्रिक मुद्दे आदी विविध विषयांवर नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे मार्गदर्शन वर्ग दरवर्षी घ्यावेत, असा काही नगरसेवकांचा आग्रह आहे. शिवसेना नगरसेवकांचा अभ्यासगटही स्थापन करणार आहे. प्रत्येक विषयासाठी नगरसेवकांचा गट तयार करण्यात येईल. हा गट समस्येचा अभ्यास करून ती सोडवण्यासाठी उपाय शोधेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत या अभ्यासगटाबाबत ओझरता उल्लेख केला.

विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शिवसेनेने पालिका निकालाचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. कोणत्या समाज समूहाची मते जास्त मिळाली, कोणता समूह शिवसेनेपासून दूर गेला, अथवा शिवसेनेच्या जवळ असलेल्या कोणत्या समूहाने मतदान केले नाही, याबद्दलचा अभ्यास करण्यात येणार आहे. काही नगरसेवकांनी हा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या आणि गमावलेल्या मतांची सांगड घालून विधानसभेसाठी मोर्चेबांधणी करण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: shivsena vidhansabha preparation start