शिवसेनेचे पाठबळ विभागले 

शिवसेनेचे पाठबळ विभागले 

ठाणे - भिवंडीबरोबरच पनवेल महापालिकेची निवडणूक होत असल्याने भिवंडीतील शिवसेनेच्या जीवाला घोर लागला आहे. प्रत्येक निवडणुकीत ठाण्यातील शिवसेना नेत्यांचे सर्व पाठबळ भिवंडीतील शिवसेनेला मिळत होते; पण यंदा ते विभागले गेल्याने भिवंडीतील व्यूहरचना जास्तीत जास्त स्वबळावर करण्याची वेळ येथील नेत्यांवर आली आहे. शिवसेनेच्या या विभागलेल्या ताकदीचा फटका या निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्‍यता आहे. 

भाजपचा वारू राज्यभरात दमदार वाटचाल करत आहे. लातूरमध्ये तर शून्यवरून 33 नगरसेवक निवडून आणण्याची किमया भाजपने केली आहे. अशावेळी सर्वच ठिकाणच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. भिवंडीतील कार्यकर्तेही या भूमिकेत असल्याने युतीच्या केवळ चर्चा होत असल्या तरी शिवसेना अथवा भाजप दोन्हीकडून किमान प्राथमिक पातळीवरील चर्चा करण्यासाठीही कोणा नेत्याने प्रयत्न केले नसल्याचे दिसले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची जंत्री घेऊन मतदारांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीतील नव्वद जागांसाठी सुमारे 350 जण पुढे आल्याने भाजपचे नेतेही स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. भाजपचा अंतर्गत सर्व्हे आणि स्थानिक नेत्यांच्या शिफारशीनंतर भाजपच्या प्रदेश स्तरावर येथील उमेदवारी निश्‍चित होणार आहे. त्याचवेळी भिवंडीतील शिवसेनेला यापूर्वी कोणतीही निवडणूक असली, की ठाण्यातील शिवसेना नेत्यांचे सक्रिय पाठबळ मिळत आले आहे. भाजपचा दमदार वारू ठाण्यात एकहाती रोखणारे शिवसेनेचे संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांची दखल मातोश्रीवरही घेतली गेली. त्यामुळेच भिवंडीच्या निवडणुकीबरोबरच त्यांच्यावर पनवेल महापालिकेच्या निवडणुकीचीही जबाबदारी देण्यात आली आहे. 

भिवंडीत संघटनात्मकदृष्ट्या दुर्लक्ष 
भिवंडीमध्ये शिवसेनेचे 17 नगरसेवक असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यूहरचनेच्या बळावर ही संख्या वाढवण्याच्या प्रतीक्षेत येथील शिवसेनेचे पदाधिकारी होते; पण त्यांच्यावर पनवेलचीही जबाबदारी दिल्याने ठाण्यातील बहुतांशी कुमक सध्या पनवेल गडाच्या दिशेला पाठविण्यास सुरुवात झाली आहे. पनवेलच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी ठाण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांवर जबाबदारीही टाकण्यात आल्याचे कळते. अशावेळी ठाण्याला लागून असलेल्या भिवंडीतील नेत्यांवर मात्र उपलब्ध कुमकवरच गड लढविण्याची जबाबदारी आली आहे. एक नगरसेवक निवडून आलेल्या पनवेलसाठी शिवसेनेत धावपळ सुरू असताना भिवंडीकडे मात्र संघटनात्मकदृष्ट्या दुर्लक्ष होत असल्याने शिवसैनिकांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com