सरकारला आता जागा दाखवून द्या : डॉ. कोल्हेंचे शिवस्वराज्य यात्रेत आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

युती सरकार पाच वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, नोकरीची मेगा भरती यात सपशेल अपयशी झाली आहे, अशी टीका डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

तळा (बातमीदार) : युती सरकार पाच वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, नोकरीची मेगा भरती यात सपशेल अपयशी झाली आहे, अशी टीका करत डॉ. अमोल कोल्हे यांनी या सरकारला आता जागा दाखवून द्या, असे आवाहन गुरुवारी (ता. १९) झालेल्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान नागरिकांना केले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा आज तळा येथे घेण्यात आली. यात प्रमुख उपस्थिती डॉ. अमोल कोल्हे यांची असल्याने या यात्रेला तुफान गर्दी उसळली होती. त्यांचे आगमन होताच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या वेळी कोल्हे यांनी गडकिल्ले भाड्याने देण्याचा सरकारच्या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. येथील नागरिक सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आणि मी दिल्ली दरबारी निवडून गेलो आहोत. आता अदिती तटकरे यांनाही आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले. देशाचे गृहमंत्री अमित शहा या महाराष्ट्रात येऊन आपल्या छाताडावर नाचत आहेत. शरद पवार यांना तुम्ही काय केलेत? असा प्रश्न करतात, हे कशाचे द्योतक आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. इथल्या माता भगिनींच्या हाती ५० टक्के मतदान आहे. आता आपण सज्ज व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले. 

याप्रसंगी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विलास ठसाळ, युवाचे शैलेश घोलप, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाध्यक्ष संजय जाधव यांसह अन्‍य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. या यात्रेत खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्षा अदिती तटकरे, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivswararaj Yatra in Tala; Dr. Amol Kolhe criticism on Yuti Sarkar