धक्कादायक! चोरट्यामुळे पोलिस, न्यायाधीशांवर क्वारंटाईन होण्याची वेळ... 

संग्रहित
संग्रहित

अंधेरी : कोरोनाच्या साथीने सर्वांना धडकी भरवली असतानाच मुंबईत एका चोरट्याने चक्क पोलिस व न्यायाधीशांचीच झोप उडवली आहे. मालाड पश्‍चिमेतील बांगुर पोलिस ठाण्यात चोरीप्रकरणी अटक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. गेल्या मंगळवारी (ता. 21) त्याला अटक झाली होती. नंतर सुनावणीसाठी त्याला न्यायालयातही नेले होते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेले पोलिस कर्मचारी, अधिकारी आणि न्यायाधीश अशा 22 जणांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे. चोरट्याला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल केले आहे; मात्र त्याच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांमध्येही भीतीचे वातावरण आहे. 

विशेष म्हणजे हा आरोपी तडीपार होता. कालावधी संपल्याने तो पुन्हा शहरात आला. त्याला सिगरेट पिण्याची तल्लफ आहे; मात्र लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद असल्याने या बहाद्दराने बांगुर पोलिस ठाणे हद्दीतील भगतसिंग नगर येथील दुकान फोडले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोध घेत मोठ्या शिताफिने 21 एप्रिलला चोरट्याच्या मुसक्‍या आवळल्या.

दुसऱ्याच दिवशी त्याला न्यायालयासमोर सादर करण्यात आले. न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली. त्यानुसार पोलिस बंदोबस्तात त्याला ठाणे मध्यवर्ती कारागृह नेले; मात्र त्या ठिकाणी जागा नसल्याने ठाण्याहून त्याला तळोजा कारागृहात नेले. सुदैवाने कारागृहाच्या अधीक्षकांनी सजगता दाखवत आरोपीची कोरोना तपासणी केली नसल्याने त्याला कारागृहात घेण्यास नकार दिला. 

त्यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी कैद्याला कोरोना तपासणीसाठी जे जे रुग्णालयात नेले. शनिवारी (ता. 25) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच बांगुर नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. आरोपीच्या संपर्कात आलेले पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि न्यायाधीशांसह 22 जणांना सध्या क्वारंटाईन करण्यात आले आहे. आरोपीवर उपचार सुरू असून तो दाखल वॉर्डबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

चारवेळा न्यायालयात 
महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीला आतापर्यंत तब्बल चारवेळा सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आले. यादरम्यान, तो अनेक पोलिस, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला. या सर्वांचा शोध घेत त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, काहीही झाले तरी आम्हाला आमचे कर्तव्य बजवावेच लागते. सध्या बाधित आरोपींच्या संपर्कात आलेल्या सर्व सहकाऱ्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्यास सांगितले आहे. 

इकडे आड; तिकडे विहिर 
दरम्यान, आरोपीला उपचारासाठी दाखल केलेल्या वॉर्डबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे; मात्र या कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची भीती आहे. तरीही कैद्यावर नजर ठेवावीच लागणार असल्याने पोलिसांना बंदोबस्ताची कसरत करावी लागत आहे. आरोपीकडे थोडे तरी दुर्लक्ष झाले आणि आरोपी पळून गेल्यास पोलिसांवरच ठपका येतो. तसेच, आरोपीला काहीही झाले तरीही पोलिसच कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्यांना धोका पत्कारून या कैद्याची सुरक्षा करावी लागत आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com