कल्याण पुर्व येथे पाण्याच्या टाकीवर चढून केले शोले स्टाईल आंदोलन

रविंद्र खरात 
सोमवार, 18 जून 2018

कल्याण पूर्व मधील पालिकेच्या 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालय समोरील पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीवर चढून माजी नगरसेवक अनंता गायकवाड सहित मनसे पदाधिकारी वर्गाने 2 तासाहून अधिक काळ ठिय्या आंदोलन केले.

कल्याण - कल्याण पूर्व मधील आमराई आणि तिसगाव गावठाण या परिसरात मागील 4 महिन्यापासून पाणी समस्या असून याबाबत पत्रव्यवहार आणि निवेदन देऊन ही समस्या दूर न झाल्याने आज सोमवार ता 18 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कल्याण पूर्व मधील पालिकेच्या 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालय समोरील पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीवर चढून माजी नगरसेवक अनंता गायकवाड सहित मनसे पदाधिकारी वर्गाने 2 तासाहून अधिक काळ ठिय्या आंदोलन केले. पालिका अधिकारी वर्गाने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतले .

मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पूर्व मधील पाणी पूरवठा करणाऱ्या टाक्यामध्ये पाणी येते मात्र कल्याण पूर्व मधील आमराई आणि तिसगाव गावठाणच्या भागात शेवटच्या घरात पाणी येत नाही तर काही भागात कमी दाबाने पाणी पूरवठा मागील 4 महिन्यापासून येत असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत माजी नगरसेवक अंनता गायकवाड सहित मनसे पदाधिकारी वर्गाने पालिकेच्या कल्याण पूर्व ड प्रभाग क्षेत्र कार्यालय मधील पाणी पुरवठा विभागाकडे, निवेदन आणि पत्र देत पाठपुरावा सुरू ठेवला होता. पाऊस सुरू होऊन ही पाणी समस्या काही संपेना न पालिका अधिकारी तोडगा काढत नसल्याचे चित्र पाहता आज सोमवार ता 18 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कल्याण पूर्व 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालय समोरील पाण्याच्या टाकीवर माजी नगरसेवक अंनता गायकवाड सहित मनसे उपशहर अध्यक्ष योगेश गव्हाणे, विभाग अध्यक्ष विनीत भोई, शाखा अध्यक्ष मनीष यादव, उपशाखा अध्यक्ष निखिल जाधव, जेष्ठ कार्यकर्ते प्रदीप मोरे आदींनी बसून शोले स्टाईलने ठिय्या आंदोलन सुरू केले. तर काही महिला आणि नागरिकांनी खाली उभे राहून त्यांना पाठींबा दिला. पाण्याची समस्या पाहता नागरीकांत संतापाचे वातावरण असून तब्बल दोन तासाने पालिकेचे पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत दोन दिवसात पाण्याची समस्या दूर करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

कल्याण पूर्व मधील पाणी समस्या बाबत अधिकारी वर्गाची बैठक बोलावली असून तांत्रिक अडचण,पाहून पाणी समस्या दूर केली जाईल, अशी माहिती पालिका पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी दिली. 

मागील 4 महिन्यापासून आमराई आणि तिसगाव मधील पाणी समस्येने नागरिक ग्रासले असून याबाबत निवेदन, पत्र देऊन ही समस्या दूर न झाल्याने आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. मात्र आगामी 2 दिवसात समस्यां दूर न झाल्यास यापेक्षा उग्र आंदोलन केले जाईल अशी माहिती माजी नगरसेवक अंनता गायकवाड यांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: sholay style agitation at kalyan east mumbai